
पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारूनच शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य केली जाऊ शकतात. त्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी वर्तणूक बदल घडवून आणावा लागेल, असे मत जी 20 परिषदेच्या डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीतील ‘इन्फुसिंग न्यू लाईफ इनटू ग्रीन डेव्हलपमेंट’ परिसंवादात सहभागी तज्ञांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे मंगळवारी हे चर्चासत्र झाले.
सामान्य नागरिकांच्या वर्तनात बदल करणे शक्य आहे. दहा वर्षापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प साधने खूप महाग होती. आता या साधनांची किंमत कमी झाल्यामुळे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा, साधनांचा वापर वाढला आहे. गुजरातमधील मोढेरा गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारे गाव असल्याचे काwन्सिल फॉर इन्व्हायरमेट एनर्जी अॅण्ड वॉटरचे अरुणभा घोष यांनी सांगितले. या चर्चासत्रात युनायटेड किंगडमचे खासदार लॉर्ड निकोलस स्टर्न, युनिडोचे संचालक स्टीफन सिकार्स, एको नेटवर्कच्या शॅनॉन ओल्सन यांनी आपली मते मांडली. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी सर्वच संबंधितांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे, यावर सर्वांनी भर दिला.
तत्पूर्वी, चर्चासत्रात आयआरईनएनएच्या उपमहासंचालक गौरी सिंग, इन्स्टिटय़ूट ऑफ ग्लोबल एन्व्हायर्न्मेंटल स्ट्रटेजीचे अत्सुशी वाताबे, संयुक्त राष्ट्र संघाचे आर्थिक आणि सामाजिक कार्यविषयक महासंचालक नितीन देसाई, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे नवरोज दुभाष, सोनम वांगचूक यांनी मत मांडले.


























































