
कुकडी डाव्या कालव्याचे रब्बीमधील आवर्तन 1 जानेवारी रोजी, तर घोड डाव्या व उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन 10 जानेवारी रोजी सोडण्याचे निश्चित करण्यात आले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
डिंभे बोगद्याच्या कामासाठी सुमारे 350 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानुसार तातडीने या कामाचा प्रस्ताव करण्याचे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील आणि विखे-पाटील यांनी दिले. या प्रकल्पातून पुणे, नगर आणि सोलापूर जिह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगांना पाणी दिले जाते. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मंत्र्यांनी दिल्या.
डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी बिगर सिंचनामधून 30 कोटी खर्चून काम करण्यात आले आहे. यावर्षी अजून 30 कोटी खर्च करण्याचे नियोजन असल्याचे मुख्य अभियंता धुमाळ यांनी सांगितले.
रब्बीत कुकडीचे एक, तर घोड कालव्यातून दोन आवर्तने कुकडी डावा कालव्याचे सुरू असलेल्या रब्बी हंगामात एक आवर्तन आणि उन्हाळी एक आवर्तन देण्यात येणार असून, पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन उन्हाळी हंगामाच्या दुसऱया आवर्तनाबाबत बैठक घेण्याचेही यावेळी ठरले. माणिकडोह धरणातून येडगाव धरणासाठी कुकडी नदीद्वारे, पिंपळगाव जोगे डावा कालवा, डिंभे उजवा कालवा, डिंभे डावा कालवा, घोड शाखा कालवा, मीना शाखा कालवा, मीना पूरक कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे नियोजनही यावेळी निश्चित करण्यात आले. घोड डावा व उजव्या कालव्याची रब्बीची दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित करण्यात आले. रब्बी हंगामानंतर पाणीसाठा उन्हाळी आवर्तनाबाबत बैठक घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
























































