
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्यावतीने 24 ते 28 डिसेंबर दरम्यान श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रदर्शनातून महिला बचतगटांसाठी एक बाजारपेठ उपलब्ध होणार असून येणाऱ्या पर्यटकांना बचत गटाने तयार केलेल्या कोकणी मेव्याच्या मेजवानीचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सरस प्रदर्शनात 75 महिला बचत गट सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 60 उत्पादनाचे आणि 15 खाद्यपदार्थांचे स्टॉल रहाणार आहेत. प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या बुरूड काम, गोधडी, लोकरीच्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, विविध प्रकारचे घरगुती मसाले, पीठे, पापड, लोणची, कोकणी मेवा यांचा समावेश सरस प्रदर्शनात असणार आहे. त्याचबरोबर मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी या कोकणी खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा लाभ पर्यटकांना होणार आहे. सरस प्रदर्शनाचे उद्घाटन 24 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि फनी गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत.
28 डिसेंबर रोजी प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनात उत्कृष्ट मांडणी, सर्वाधिक विक्री करणाऱ्या बचत गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी केले.यावेळी प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर उपस्थित होत्या.




























































