लेख – बायबलमधील भविष्यवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीनिवास बेलसरे ([email protected])

येशूच्या जन्माआधीच त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्टय़े कशी काय लिहून ठेवली असतील, याचे कुणालाही आश्चर्यच वाटेल. तरीही हा झाला भूतकाळ! पण बायबलमध्ये पुढे येणाऱ्या काळाविषयीची भाकितेही आहेत. जगाचा अंतकाळ अनेक दुर्दैवी घटनांनी भरलेला असणार आहे असे बायबल सांगते. त्या घटना जशा  खगोलशास्त्रीय, भूगर्भशास्त्रीय, हवामानविषयक असतील तशाच समाजशास्त्रीयसुद्धा असतील. बायबलमध्ये केवळ दुःखद भविष्यवाण्याच केल्या आहेत असे नाही. त्यात आनंददायक, सुखद आणि मनाला मोहून टाकणारी भाकितेही दिसतात.

उद्या नाताळ! प्रभू येशू जयंती! ख्रिस्तजन्माचा आनंद  जगभरचे लोक साजरा करतात. हॉटेल्सचा धंदा वाढतो. नवे कपडे, वेगवेगळे खाद्यपदार्थ, मिठाई, विशेषतः केक वाटले जातात. पर्यटनाला उत्तेजन मिळते. ख्रिस्ती नसलेले भारतीयही या सणात सहभागी होतात. मात्र अनेकांना हे माहीत नसते की येशूचा जन्म ही एक सामान्य घटना नव्हती! येशूचा जन्म हा एका ईश्वरी योजनेतील भाग होता. त्याचे पुरावेही बायबलमधील येशूच्या जन्माआधीच्या भागात दिसतात.

जुन्या करारात ख्रिस्त कसा जन्माला येणार त्याचा तपशील सुमारे 700वर्षे आधी लिहून ठेवलेला आढळतो. ‘यशया’ नावाच्या भागात लिहिले आहे, “ईश्वर मानवजातीसाठी एक संकेत देईल. एका कुमारिकेच्या पोटी एक पुत्र जन्माला येईल. लोक त्याला ‘इम्यॅनुएल’, म्हणजे ‘आम्हाबरोबर देव’ म्हणतील.’’

दुसरा एक प्रेषित ‘मिखा’ यानेही ख्रिस्तपूर्व  737 ते 696वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे, “बेथलहेमा, (येरुसलेमजवळील एक गाव) तू यहुदा प्रांतातील छोटे खेडे असलास तरी तुझ्यातून असा एक जन्माला येईल जो इस्राएलवर राज्य करेल, ज्याचा उगम प्राचीन असेल.’’ या दोन्ही प्रेषितांनी केवळ येशूच्या जन्माचे वेगळेपणच नव्हे (कुमारी मातेच्या पोटी जन्म) तर त्याचे नेमके जन्मगावही सांगितलेले आहे.

याशिवाय प्रभूच्या व्यक्तिमत्वाविषयी ‘यशया’ 11वा अध्याय बरेच काही सांगतो. “त्याच्यावर परमेश्वराचा आणि समंजसपणाचा प्रभाव राहील, तो डोळ्याने दिसते किंवा कानाने ऐकू येते तेवढय़ावरच न्याय करणार नाही. दुबळ्यांचा न्याय तो यथार्थतेने करील.

येशूच्या जन्माआधीच त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्टय़े कशी काय लिहून ठेवली असतील, याचे कुणालाही आश्चर्यच वाटेल. तरीही हा झाला भूतकाळ! पण बायबलमध्ये पुढे येणाऱ्या काळाविषयीची भाकितेही आहेत. जगाचा अंतकाळ अनेक दुर्दैवी घटनांनी भरलेला असणार आहे असे बायबल सांगते. त्या घटना जशा  खगोलशास्त्रीय, भूगर्भशास्त्रीय, हवामानविषयक असतील तशाच समाजशास्त्रीयसुद्धा असतील. आपण गेल्या 40/50 वर्षांत समाजाच्या मानसिकतेत झालेले निवडक बदल तटस्थपणे अभ्यासले तरी या भविष्यवाणीची सत्यता पटते. केवळ 50 वर्षांत जग किती वेगाने बदलले! त्यापूर्वी घटनांचा वेग आणि बदलाचे प्रमाण आताच्या एक शतांशही नव्हते. अलीकडे अचानक हवामानाचे वेळापत्रक पूर्णपणे कोसळल्याचे आपण सतत पाहतो. वेगवेगळ्या साथीच्या रोगराईने जग त्रस्त झाले आहे. जगण्याचा आधार असलेली शेती विनाशाकडे जाते आहे. अणुबॉम्बमुळे ‘आकाशातून अग्नीच्या वर्षावाच्या’ बायबलमधील भविष्यवाण्या खरे ठरण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. भूकंप, टोळधाडी, त्सुनामीसारख्या आपत्ती, दुष्काळ, वारंवार होणारी युद्धे याबद्दलची भाकिते आणि आजचे वास्तव अजिबात वेगळे नाही.

याशिवाय माणसाच्या वर्तनातील, अत्यंत दुर्दैवी बदल अलीकडे स्पष्ट दिसत आहेत. येशूचा परमभक्त असलेल्या संत पौल याने त्याच्या तिमोथी नावाच्या शिष्याला लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर पहा, जणू आजच्या समाजाचेच वर्णन केले आहे असे वाटते! पौल म्हणतो – “शेवटच्या काळात कठीण समय येईल. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्न, अधार्मिक, इतरांवर प्रीती नसणारे, क्षमा न करणारे, चहाडखोर, मोकाट, क्रूर, चांगल्याच्या विरुद्ध विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारे असे होतील.’’

संत पौल पुढे लिहितो, “मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व वासनांनी बहकलेल्या, कमकुवत मनांवर ताबा मिळवितात.’’ आज मनोरंजन विश्वातील अश्लीलता, अनैतिकता आणि तिचा तरुण पिढीवर होत असलेला प्रभाव पाहता या भविष्यवाणीची सत्यता सहज पटते.

भविष्यवाणीत शुभ वार्ताही!

बायबलमध्ये केवळ दुःखद भविष्यवाण्याच केल्या आहेत असे नाही. त्यात आनंददायक, सुखद आणि मनाला मोहून टाकणारी भाकितेही दिसतात. ‘यशया’तील 60व्या अध्यायात अशा अनेक ओव्या आहेत. येशूच्या आगमनाविषयी  लिहिताना भविष्यवेत्ता त्याच्या जन्मभूमीला उद्देशून म्हणतो, “हे यरूशलेम नगरी, माझ्या ज्योती, ऊठ. तुझा प्रकाश येत आहे. परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल. आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत. पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल, त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल. तुझा चेहरा आनंदाने उजळेल. तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा चढाई करणार नाहीत, तुला लुटणार नाहीत. यापुढे तुला चंद्र-सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. तुझा सूर्य कधी मावळणार नाही आणि चंद्राचा क्षय होणार नाही.

या सर्व सुवार्तां खऱ्या होण्यासाठी येशू जगात येणार असल्याचे भविष्यही बायबल त्याच्या जन्माआधीच सांगते – “योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन. मी या गोष्टी घडवून आणीन,’’ असेही बायबल सांगते.

नाताळचा आनंदाचा सण साजरा करताना या शुभवार्ता देणाऱ्या भविष्यवाण्यांचे स्मरण सर्वांना आनंददायी ठरो!