मुंबईला ऑक्सिजनची चिंता नाही, महापालिकेकडे 4 हजार क्युबिक मीटर ऑक्सिजन साठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाला चिंतेत टाकणाऱया कोरोनाच्या बीएफ 7 व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. कोरोनाच्या दुसऱया आणि तिसऱया लाटेत सर्वाधिक रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला होता. मात्र, अशीच आणीबाणीची परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, डय़ुरा सिलिंडर्स आणि पीएसए टँकच्या स्वरूपात सुमारे 4 हजार क्युबिक मीटर ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईला ऑक्सिजनची चिंता नाही, अशी माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. मास्क, गर्दीची ठिकाणे टाळणे, हात धुणे यासारख्या खबरदारीच्या उपाययोजना आणि कोरोना नियमांचे पालन करून मुंबई महापालिकेने पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवले. मात्र, ऑगस्ट 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱया लाटेत कोरोना रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होत गेली आणि रुग्णसंख्या 11 हजारांच्या घरात पोहोचली होती तर 21 डिसेंबर 2021 नंतर मुंबईत तिसऱया लाटेने धडक दिली. कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या 21 हजारांच्या घरात पोहोचली होती.

बुस्टर डोसकडे दुर्लक्ष

मुंबईत सध्या 92 टक्के लोकांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. मात्र, कोरोनाची तिसरा लाट ओसरल्यामुळे मुंबईकरांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे. आतापर्यंत केवळ 15 टक्के मुंबईकरांनी बुस्टर डोस घेतला आहे. मात्र, आता बीएफ 7 च्या पार्श्वभूमीवर, पुन्हा बुस्टर डोस घेण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. दरम्यान, कोरोना आणि बुस्टर डोसचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची तक्रार मुंबईकर करत आहेत.

मास्क वापरण्याचे आवाहन

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत, स्वच्छता पाळावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

मुंबई, राज्यात कोरोना नियंत्रणात

मुंबईत कोरोना नियंत्रणात असून आज दिवसभरात कोरोनाचे 9 रुग्ण सापडले तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्णालयात तसेच गंभीर रुग्णांची संख्याही गेले काही दिवस शून्यावर आहे. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात 32 कोरोना रुग्ण सापडले तर 20 जण कोरोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 148 वर आली आहे.