जामखेड दुहेरी हत्याकांड प्रकरण  मुख्य आरोपीला जन्मठेप; पुराव्याअभावी 13जण निर्दोष श्रीगोंदा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राजकीय वर्चस्ववादातून पोस्टर फाडल्याचा राग मनात धरून जामखेड शहरात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खटल्यातील मुख्य आरोपी स्वामी उर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असून, सबळ पुराव्याअभावी उर्वरित 13 आरोपींची  निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यंनी हा निकाल दिला आहे.

 जामखेड शहरात दोन राजकीय गटात अनेक वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. राजकीय शुभेच्छांचे पोस्टर फाडल्याच्या रागातून 28 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी एका हॉटेलात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण नगर जिह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. राजकीय वर्चस्ववादाचे रूपांतर दुहेरी हत्येपर्यंत झाल्याने खळबळ माजली होती. पोलिसांनी या गुह्यात स्वामी उर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे हे तपासी अधिकारी होते.

 खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्ववादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड. उमेशचंद्र यादव-पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला होता.  अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी आज या खटल्याचा निकाल दिला. गायकवाड वगळता इतरांची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली. खटल्यात सरकारी

पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले.