
कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटकच्या राज्यपालांच्या बैठकीतील माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी विधानपरिषदेत झालेल्या चर्चेत सहभाग घेताना आमदार सतेज पाटील यांनी भूमिका मांडली.
सतेज पाटील म्हणाले, गेल्या 50 वर्षात कधी झाली नाही, अशी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या राज्यपालांची बैठक 4 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात झाली. बेळगाव, कारवार, विजापूर तसेच सोलापूर, कोल्हापूर आदी सीमाभागातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, सचिव हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अलमट्टीच्या विषयावर चर्चा झाल्याचे प्रसारमाध्यमांतून समजले. त्यामुळे राज्यपालांच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? नेमके त्याचे इतिवृत्त काय आहे? याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृह आणि महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी. सभागृहातील सदस्यांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा तो हक्क आहे.
गेल्या काही दिवसांतच सीमाप्रश्न का उकरून काढला जातोय. याचा विचार करणे गरजेचे आहे. एका बाजूला आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि दुसरीकडे सीमाभागातील लोकांना कर्नाटकातून आंदोलन करण्यासाठी कोल्हापुरात यावे लागते, ही लोकशाहीत दुर्दैवी बाब आहे. दोन दिवसांपूर्वी सीमाभागातील चार ते पाच हजार लोकांनी कोल्हापुरात येऊन आंदोलन केले आहे. त्यांना आपल्या हक्काच्या प्रश्नाबाबत कर्नाटकात आंदोलन करता येत नाही, ही शोकांतिका असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
सीमावासीयांच्या पाठीशी असल्याचे कृतीतून दाखवून देण्याची वेळ
यापूर्वीचा अनुभव पाहता सीमाप्रश्नी शासनातल्या एका मंत्र्याकडे शंभर टक्के जबाबदारी देणे गरजेचे आहे. विधानपरिषद सभापतींच्या माध्यमातून शासनाने सीमाप्रश्नी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण सीमावासीयांच्या पाठीशी आहोत हे फक्त भाषणातून नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढय़ात सहभागी होण्याची अपेक्षाही आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली.


























































