विल्यमसनच्या द्विशतकामुळे न्यूझीलंडला आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार केन विल्यमसनने आपल्या  कारकीर्दीतील पाचवे द्विशतक झळकावत न्यूझीलंडला 9 बाद 612 धावांचा डोंगर उभारून दिला आणि पाकिस्तानविरुद्ध 174 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने चौथ्या दिवसअखेर 2 बाद 77 अशी मजल मारली असून कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी त्यांच्या फलंदाजांना पाचवा दिवस खेळून काढावा लागेल.

बुधवारी कसोटीतील शतकांचा रौप्य महोत्सव साजरा करणाऱया विल्यमसनने आज त्याचे परिवर्तन द्विशतकात केले. त्याने इश सोधीबरोबर केलेली 159 धावांची भागी खूप महत्त्वाची ठरली. सोढीने 180 चेंडूंत 65 धावांची धीरोदत्त खेळी केली. 2 धावांत 3 विकेट पडताच विल्यमसनने आपले शतक पूर्ण होताच आपला डाव घोषित केला. पाकिस्तानच्या अब्दुला शफिक आणि इमाम उल हक यांनी 47 धावांची सलामी दिली, पण ही जोडी फुटल्यानंतर शान मसुदही (10) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर इमाम (ना. 45) आणि नौमन अली (4) यांनी न्यूझीलंडला आणखी यश मिळू दिले नाही. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तान 97 धावांनी पिछाडीवर होता आणि उद्या कसोटीचा शेवटचा दिवस आहे.