कामगार दाम्पत्यानेच मारला बिल्डरच्या घरात डल्ला; नागपूर येथून दाम्पत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घरकामासाठी असलेल्या दाम्पत्यानेच घरातील रोकड आणि 57 तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना येरवड्यातील कल्याणीनगर भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आता नागपूर येथून दाम्पत्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांची रोकड, 49 तोळे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

राजपाल वामन हारगे (39, रा. कल्याणीनगर, मूळ. रा. लातूर), उर्मिला हारगे (38) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत कल्याणीनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून कल्याणीनगर येथे वास्तव्यास आहेत. मागील पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे हारगे दाम्पत्य काम करतात. त्यांना राहण्यासाठी व्यावसायिकाच्या बंगल्याशेजारीच रूम उपलब्ध करून देण्यात आली होती. सोमवारी (दि.26) बांधकाम व्यावसायिक आपल्या कुटुंबियासह अलिबाग येथे फिरायला गेले होते. या दरम्यान दोघांनी बंगल्याच्या तळमजल्यावरील बाथरूमच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील 57 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला.

बांधकाम व्यावसायिक घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ येरवडा पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून येरवडा पोलिसांनी तात्काळ आरोपीचा माग काढत नागपूर येथून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, सोन्या चांदीचे दागिने असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, स्वप्नाली गायकवाड, अमजद शेख, सागर जगदाळे, दत्ता शिंदे, सुरज ओंबासे, कैलास डुकरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
बांधकाम व्यावसायिकाच्या घरात घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजपाल हारगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर लातूर जिल्ह्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना घरकामासाठी ठेवताना त्यांचे रेकॉर्ड तपासले गेले नसल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून वारंवार आव्हान करण्यात येत असले तरी नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.