
संजय मोने
नवीन वर्ष सुरू होतं जानेवारी 1 ला. या वर्षी 1 जानेवारी 2023, पण येणाऱ्या पुढच्या वर्षात काय करायचं याचे बेत अत्यंत आग्रहाने, पोटतिडकीने, कळवळून, अनेकांच्या शपथा घेऊन आखले जातात. ते मागच्या वर्षात आणि नव्या वर्षाचे संकल्प पुढे काही दिवसांतच कसे ढासळतात याचे यथासांग वर्णन अनेक लेखकांनी, असंख्य वेळा, करोडो लेखांत केले आहे. त्यांची संख्या इतकी आहे की, त्या लेखांना घाबरून एखादं नवीन वर्ष उगवणारच नाही असं वाटायला लागलंय.
माझी लेखमाला नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सुरू होणार, परंतु नवीन वर्षाचे स्वागत, मागच्या वर्षाचा आढावा, घडलेल्या तमाम घटनांवर माझी मतं (म्हणजे विचारत कोणीच नाही, आपणच आपली मांडायची) यापैकी काहीही या लेखमालेत नसणार आहे. राजकारणावर तर लिहिणारच नाही. सर्वसाधारण लोकांचं राजकारणावरील मत हे मतदानाच्या दिवशी मिळालेली सुट्टी कुठल्या तरी जवळपासच्या एकांत असलेल्या ठिकाणी जाऊन छानपैकी न्याहारी करून ऑमलेट-पाव किंवा पोहे, शिरा खाऊन… this politics म्हणजे सगळा खेळ झालाय, no body is noncorrupt असं इंग्रजी वाक्यात नाइलाज म्हणून (नाइलाज इंग्रजी भाषा येत नसल्याचा की, मातृभाषा मराठी आहे याची जाणीव असल्यामुळे हा वादाचा मुद्दा.) मराठी शब्द वापरून मतदान न करता मतांची पिचकारी मारण्यात खर्च होतो. तेव्हा ते माझ्या लेखमालेत असणार नाही.
प्रश्न मूळ हा आहे की, लिहायचं काय? हल्ली वृत्त वाहिन्यांनी एक नवीन शब्दप्रयोग वापरून एक नवीन भाषेला जन्म दिला आहे. ‘माझ्या माध्यमातून मी आपल्या भेटीला येत आहे,’ वगैरे शब्द येतात. कुठलं माध्यम? सरळ मी आपल्यासमोर एक लेखमाला मांडणार आहे, असं म्हणायचं ना?
काही काळ चालणाऱ्या लेखमालेचा विषय काय असावा आणि मग त्याचा ढाचा किंवा आलेख कसा असावा ते आधी ठरवून निश्चित करायचं आणि मग त्याबरहुकूम लिहायचं असा बेत आखला आणि गाडी तिथे जरा अडखळली, कारण सगळय़ांना आवडेल असं लिहित राहणं कुणालाच शक्य नाही. रामायण आणि महाभारत ते दोन अपवाद सोडल्यास. साक्षात पु. ल. देशपांडे साहेबसुद्धा ‘साडेतीन टक्क्यांचे लेखक’ असं म्हणून हिणवले गेले, तिथे इतरांचे काय? दुसरे लोकप्रिय आणि मान्यवर लेखक म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, पण ते नंतर बघू. आजच्या काळात काही कोणी लिहिलं तर ते कोणाला आवडेल याचा विचार न करता, त्या लेखनाबद्दल कोण कोण काय आक्षेप घेतल्याचा अंदाज आधी बांधावा लागतो.
पूर्वी भावना हे मुलीचं नाव असायचं. आता भावना म्हणजे एखाद्या तर्कशून्य विचारांमुळे दुखावणारी बाब झाली आहे.
लिहिताना आदम आणि इव्हची गोष्ट लिहिली, तर त्यात कोणीतरी कुणालातरी सफरचंद खाऊ घालत असा उल्लेख आहे. त्यावरून लगेच हिमाचल प्रदेशचे सफरचंद व्यापारी लेखाचं गुणगान करणार. ते झालं रे झालं की, लगेच डॉक्टर लोकांची संघटना किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे शक्य नाही म्हणून निषेध करणार.
सगळय़ा गोष्टींचा विरोध आपल्या मतलबासाठी करणाऱ्या लोकांचा. एक गट किंवा झुंड नव्याने तयार झाला आहे. त्याला गरीब बिचारा शाईने लिहिणारा लेखक काय प्रतिकार करणार.
या निषेधाच्या प्रकरणात हल्ली काही गोष्टींचा उपयोग वेगळय़ाच कारणांसाठी व्हायला लागलाय. उत्तमोत्तम ग्रंथ ज्या शाईने लिहिले गेले, अफझल खानाला त्याच्या छावणीतून बाहेर काढून, प्रतापगडावर आणून त्याचा निःपात केला. त्यासाठी आमंत्रण देणारे खलिते ज्या शाईने लिहिले, महाकाव्य लिहिली गेली ती शाई, महामानव पै. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना रचली ती शाई, फार सुंदर काव्य ज्या शाईने लिहिले ती शाई, जगप्रसिद्ध चित्रपटांच्या कथा लिहिल्या गेल्या ती शाई, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ सारखा अग्रलेख लिहिला गेला ती शाई, जगातल्या सगळय़ात मोठय़ा लोकशाहीत प्रतिनिधी निवडून सरकारे बनवताना आणि मतदान करून उन्मत्त राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देताना बोटाला लावली जाते ती शाई. आज या शाईचा उपयोग लोकांच्या अंगाला फासण्यासाठी आणि तोंडाला लावण्यासाठी सर्रास केला जातो. लेखकाचे बलस्थान असणाऱ्या शाईचा असा उपयोग झाला तर लेखक निर्भीडपणे काय लिहिणार? म्हणजे त्याने कायम डोळय़ात अंजन घालणारे लिहीत जावे असं नाही, पण आता विनोदीही लिहिण्याची सोय उरली नाही. चुकूनमाकून लिहिताना वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्यवसायविषयक म्हणी वापरल्या की, धमक्या आल्याच म्हणून समजा.
फार फार वर्षांपूर्वी कोणीतरी एका आमदाराने समर्थ रामदास यांच्याबद्दल काहीतरी कुचाळकी करणारं एक पुस्तक छापलं. त्याचा समाचार घेताना आचार्य अत्रे साहेबांनी तीन अग्रलेख लिहून, त्या आमदाराची मुद्देसूद ‘बिनपाण्याने’ केली. त्या लेखातली भाषा आजच्या काळात लिहू लागलो, तर लिहिणाऱयाचं काय होईल याची कल्पना करता येणार नाही. अत्रे साहेब कुणालाच भीक घालत नसत.
आजचा लेखक तसा नाही (अपवाद वगळता), पण मग तरीही काय लिहायचे?
ज्यांच्या कुठल्याही लेखनावर कोणीही आक्षेप घेतला नाही कधीच ते लेखक मला अत्यंत विषादाने म्हणाले, ‘वाद न होता लिहायचं असेल तर इथून पुढे मूळाक्षरे, अंकलिपी आणि बाराखडी लिहायला लागणार किंवा गणितं लिहून द्यायला लागणार.’ मी त्यांना म्हणालो, ‘अहो! यातही वाद, समस्या निर्माण केली जाईल.’
‘झ’ची बाराखडी अश्लीलता सुचवते असा निष्कर्ष काढला जाईल. बबन ‘कमळ’ बघ! असे लिहिले तर राजकीय प्रचार करणारे लेखन असा शिक्का लागेल. त्यामुळे वाद पेटवायला कारण लागतंच असं नाहीये आणि तो पेटवणारे करविते धनी वेगळेच असतात आणि बहुतेक वेळा कुठेतरी बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांना विपरीत अर्थ देऊन असे वाद निर्माण होतात.
त्यामुळे आता लेखकांना प्रत्येक शब्दाचा दहा वेळा विचार करून लिहावं लागणार. कायम धोक्याचा पंदील, आतलं इंधन अंगावर पडणार नाही, हे ध्यानात घेऊन लिहणं गरजेचं होणार.
विचारस्वातंत्र्य म्हणजे काही मोजक्या नतद्रष्ट लोकांना पटणारे विचार अशी व्याख्या होणार. त्यामुळे माझी लेखमाला काय असणार यापेक्षा त्यात काय नसणार याची काळजी घेत लिहावं लागणार. चांगली गोष्ट एकच आहे. शिवसेना हा हिंदुस्थानातील बहुदा एकमेव पक्ष असावा, ज्यात जात-पात बघून कुठलंही पद मिळत नाही. त्यामुळे त्यांचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मला मोकळेपणाने लिहिता येईल.
असो! मला भेटलेल्या व्यक्ती, ज्या माझ्या आयुष्यात गंमत घडवून गेल्या, काहीनी अंतर्मुख करायला लावलं, काहीनीं नवीन दृष्टी दिली, त्यांना मी आपल्याला भेटवणार आहे. निखळ गंमत याशिवाय या लेखमालेत कुठलाही गंभीर अर्थ शोधू नका. सापडणार नाही, मात्र वाचताना चार घटका मजा सापडली कुठे तर जरूर आस्वाद घ्या.
पात्रांची नावं आणि स्थळं सगळय़ांच्या सोयीसाठी काही वेळा बदलली आहेत.
(लेखक ज्येष्ठ अभिनेता आहेत.)





























































