गावाहून पुण्यात आलेल्या तरूणाला लुटले; कोयत्याने मारहाण करण्याचा प्रयत्न, पौड रस्त्यावरील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावाहून आल्यानंतर घरी जाण्यासाठी रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करीत त्याचे कपडे, मोबाइल असा 25 हजारांचा ऐवज दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटून नेला. ही घटना 31 डिसेंबरला पहाटे पावणेचारच्या सुमारास कोथरूडमधील पौड रस्ता परिसरात घडली.

याप्रकरणी तरूणाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण 31 डिसेंबरला रात्री उशिरा गावाहून परत आला होता. त्यानंतर तो पौड रस्ता परिसरातून पायी घरी चालला होता. त्यावेळी दोन दुचाकीवरील चौघांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. कोयत्याने त्याच्या पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, बॅगेत वस्तू असल्यामुळे तरूण जखमी झाला नाही. त्यानंतर चोरट्यांनी तरूणाकडील बॅग, मोबाइल असा 25 हजारांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी तपास करीत आहेत.