
राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने नगर जिह्यातील अकोले तालुक्यातील तीन आणि पारनेर तालुक्यातील दोन अशा पाच पाणी योजनांना ‘जलजीवन मिशन’ कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे या पाच गावांतील पाणीप्रश्न मिटणार असून, या पाच योजनांसाठी 18 कोटी 55 लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतचा शासननिर्णय पाणीपुरवठा विभागाने काढला आहे.
नगर जिह्यातील पाच पाणीपुरवठा योजनांचा दरडोई खर्च हा विहीत निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे या ठिकाणी नवीन पाणी योजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. ग्रामीण भागात प्रत्येक घरातील व्यक्तीला दरडोई 55 लिटरप्रमाणे पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्यातून ‘राष्ट्रीय जलजीवन मिशन’ कार्यक्रम सुरू आहे. या मिशनसाठी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पाण्याची गुणवत्ता आणि देखभालीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार अकोल तालुक्यातील खिरेविरे गावासाठी 4 कोटी 30 लाख 5 हजारांची, केळी, ओतूर गावसाठी 4 कोटी 18 लाख 83 हजारांची, कोंभाळणे गावासाठी 2 कोटी 36 लाख 80 हजारांची, तर पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावासाठी 3 कोटी 78 लाख 53 हजार व शिरापूर गावाला 3 कोटी 91 लाख 52 हजार रुपयांच्या पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनांची कामे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येणार असून, योजना पूर्ण झाल्यावर एका महिन्यात संबंधित ग्रामपंचायतीला हस्तांतरण करावी लागणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर वर्षभर योजना तयार करणाऱया कंत्राटदारांना चालवावी लागणार आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायत यांना त्या वर्षभरातील पाणीपट्टी नळजोडणीधारकांकडून वसूल करावी लागणार आहे.

























































