
पंतप्रधानांनी अचानक येऊन जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे हजारो लोक बँकांच्या रांगेत मरण पावले, बेरोजगारीमुळे लाखोंनी आत्महत्या केली. त्यामुळे नोटाबंदी हे एक आर्थिक हत्याकांड होतं, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनेची भूमिका ही गेल्या दीड दोन महिन्यांपासून सातत्याने आम्ही मांडतोय. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपने नेमलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत पाठवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी व्यक्ती राजभवनात कशी काय बसू शकते? मुळात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांचा साधा निषेध करू नये. आणि त्यांचे लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेत. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक, धर्मवीर, महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. पण, त्यांचे वडील, या देशाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान तुम्ही विसरता कसे? आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात न्याय होऊ दे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्या दोघांचे गट आणि पक्ष यांनी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात रस्त्यावर उतरावं, जसे आज उतरलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू, असं राऊत यावेळी म्हणाले.
नोटाबंदीवरील प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, मी प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड होतं, हे या देशात घडलं. हजारो लोकं बँकांच्या रांगेत मरण पावले. नोटबंदी जी बेरोजगारी निर्माण झाली, त्याच्यामुळे लाखो लोकांनी रोजगार गमवला, लाखोंनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या आर्थिक हत्याकांडाला जबाबदार कोण आहे, याचं उत्तर न्यायालयाने दिलं नाही. आम्ही हा प्रश्न विचारत नाही की योग्य की अयोग्य आहे. पण, याला जबाबदार कोण, त्याचा काय फायदा झाला. पंतप्रधान मोदी यांनी अचानक येऊन सांगितलं की हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द. त्याची कारणं त्यांनी काय दिली होती? मुख्य प्रवाहातला काळा पैसा बंद होईल, टेरर फंडिंग बंद होईल. त्यानंतर नार्कोटिक्समध्ये जे पैसे येताहेत ते बंद होतील. मुख्य म्हणजे चलनातील बनावट नोटा संपून जातील. पण उलट झालं. आता बनावट नोटांचं प्रमाण वाढलं आहे. कश्मीरसह देशभरात दहशतवाद कमी झालेला नाही. त्यांचं टेरर फंडिंग सुरूच आहे. असे अनेक प्रश्न आहेत. काळा पैसा हा अधिक प्रमाणात वाढला आहे. मग नोटबंदी ही वैध कशी हा प्रश्न लोकांच्या मनात आहे. म्हणून न्यायमूर्ती नागारत्ना यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, असं राऊत यावेळी म्हणाले.






















































