पाच कोटींवर तीनशे कोटींचे व्याज; नागपूर अधिवेशनात फाइल ‘क्लीअर’, अधिकाऱ्यावर संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्धा जिल्ह्यातील पुलाच्या बांधकामाच्या संदर्भातील 5 कोटी 71 लाख रुपयांच्या थकीत रकमेवर 300 कोटी रुपयांचे चक्रवाढ व्याज देण्याची फाइल घाईघाईने ‘क्लीअर’ करण्याचा कारनामा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वर्धा जिल्ह्यातील जाम ते चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रस्त्यावर साखळी पुलांचे बांधकाम करण्याचे काम खरे अॅड. तारपुंडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. या पुलाच्या बांधकामाच्या संदर्भात लवादाने दिलेल्या निकालाला वेगवेगळय़ा न्यायालयात आव्हान दिल्यामुळे पाच कोटींच्या देय रकमेवर तब्बल 300 कोटी रुपयांचे चक्रवाढ व्याज द्यावे लागले.

या प्रकरणाची सरकारने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अनेक मुद्दे पुढे येऊ लागले आहेत. कारण 13 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याप्रकरणी 300 कोटी रुपये देण्याबाबत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सर्व मंत्री नागपूरला रवाना झाले. हिवाळी अधिवेशन आटोपून मंत्री परत येण्याची वाट न बघता या प्रकरणाची फाइलच नागपूरला नेण्यात आली. त्यावर मंजुरीची मोहोर उमटवण्यात आली. त्यानंतर ही फाइल पुन्हा मंत्रालयात आणली. त्यानंतर कंत्राटदाराला तीनशे कोटी रुपये अदा करण्याबाबत घाईघाईने जीआर जारी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.