प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 43 व्या ‘प्रबोधन गोरेगाव’ आंतरशालेय क्रीडा महोत्सवास आजपासून दणक्यात सुरुवात झाली. वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेला हा क्रीडा महोत्सव 8 जानेवारीपर्यंत खेळविला जाणार आहे. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, मल्लखांबसह अॅथलेटिक्स, बुद्धिबळ, कराटे, टेनिस, जलतरण आणि तिरंदाजी या खेळांचाही समावेश आहे.

शालेय क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणाऱया प्रबोधन शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रबोधन क्रीडा भवन येथे आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा क्रीडा महोत्सवांत शालेय खेळाडूंनी मोठय़ा संख्येने आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते व ‘प्रबोधन गोरेगाव’चे संस्थापक सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या क्रीडा महोत्सवाला आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. अशा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.