
थर्टीफर्स्टसाठी येणाऱ्या पर्यटकांकरिता रत्नागिरी एसटी विभागाने सुरू केलेल्या रत्नागिरी दर्शन गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सिंधुदुर्ग दर्शन ही गाडी लांजा आगारातून सुरू होणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरी दर्शन गाडी आता शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी धावणार आहे.
एसटी विभागाने पर्यटकांसाठी 28 ते 31 डिसेंबरदरम्यान रत्नागिरी दर्शन ही विशेष गाडी सुरू केली होती. ही गाडी रत्नागिरी तालुका आणि राजापूर तालुक्यातील पर्यटन स्थळांना आणि तीर्थस्थळांना भेट देणार होती. या गाडीला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी 16 प्रवासी होते. दुसऱ्या दिवशी 36, तिसऱ्या दिवशी रत्नागिरी दर्शनच्या 2 गाड्या फूल झाल्या आणि तिसऱ्या गाडीमध्ये 36 प्रवासी बसले. त्यानंतर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी प्रत्येकी 40 प्रवासी होते. रत्नागिरी दर्शन या गाडीला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ही गाडी शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सुरू राहणार आहे.
रत्नागिरी दर्शनप्रमाणे लांजा आगारातून सिंधुदुर्ग दर्शन हो गाडी सुरु करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग दर्शन ही गाडी मालवण, कुणकेश्वर, देवगड, तारळ, रॉकगार्डन, कसाल आणि तेथून लांजा अशी धावणार आहे. या गाडीसाठी प्रौढांना 650 रुपये तर लहान मुलांसाठी 325 रुपयांचा तिकीट दर आकारला जाणार आहे. ही गाडी लवकरच सुरू होणार आहे.






















































