
>> आशुतोष बापट
समुद्रमंथनातून अमृत बाहेर आल्यावर देवांनी ते अमृत दानवांना न देता स्वतःकडे ठेवले. त्या वेळी देवांना गणपतीचा विसर पडला म्हणून त्याने तो अमृताचा घट देवांच्या हातून काढून घेतला आणि तो तिथून निघून जाऊ लागला. तो जाताना अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्या ठिकाणी एक स्वयंभू शिवलिंग तयार झाले. इंद्र आणि इतर देवांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी गणपतीची क्षमा मागितली. गणपतीने या शिवलिंगाला ‘अमृतघटेश्वर’ असे नाव देऊन, त्याची नियमित पूजा करण्याची अट देवांना घातली आणि नंतरच तो अमृतघट देवांना परत केला. हे शिवलिंग ज्या ठिकाणी निर्माण झाले ते स्थान म्हणजे मेलकडंबुर. कुठल्याही ठिकाणाला अशी एखादी सुंदर आख्यायिका जोडली गेलेली असेल, तर ते ठिकाण अजूनच रमणीय होते. तामीळनाडूमध्ये जरा आड बाजूला हिंडताना अशी बरीच ठिकाणे निरनिराळय़ा कथा घेऊन आपल्या समोर येतात आणि मग आपण त्या कथा आणि त्या ठिकाणांमध्ये हरवून जातो.
चोळांच्या सुप्रसिद्ध गंगैकाsंडचोळपुरमपासून जेमतेम 14 कि.मी. वर वसले आहे मेलकडंबुर. पुढे देवांची माता अदिती या अमृतघटेश्वराची पूजा करण्यासाठी रोज स्वर्गातून इथे येत असे. दररोज इथे येणे हळूहळू तिला अवघड होऊ लागले, तेव्हा इंद्राने असे ठरवले की, या मंदिराला रथाचे रूप द्यावे आणि ते मंदिर स्वर्गलोकात घेऊन जावे, म्हणजे आईला रोज इथे यायची गरज पडणार नाही. इंद्र तसे करू लागल्यावर गणपतीने आपल्या पायाने रथ दाबून धरला. त्यामुळे रथाचे एक चाक जमिनीत रुतून बसले आणि रथ काही केल्या हलेना. इंद्राच्या हे लक्षात आल्यावर त्याने गणपतीची प्रार्थना केली आणि हा रथ स्वर्गलोकात नेऊ देण्यासाठी विनंती केली. गणपतीने इंद्राला सांगितले की, त्याने एक सहस्र शिवलिंगांची स्थापना केली तरच हा रथ त्याला इथून नेता येईल. इंद्र शिवलिंगांची स्थापना करू लागला, मात्र प्रत्येक वेळी शिवलिंग तयार केले की, ते भग्न व्हायचे. यामुळे इंद्र अगतिक झाला. त्याचा अहंकार गळून पडला. त्याने मनोभावे शिवाची करुणा भाकली. शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले की, इंद्राने एक सहस्रवेळा शिवनामाचा जप करून एकच शिवलिंग इथे प्रस्थापित करावे. इंद्राने तसे केल्यावर महादेव ‘अमृतघटेश्वराच्या’ रूपात प्रकट झाले आणि म्हणाले की, त्यांची इच्छा इथेच राहण्याची आहे. त्यामुळे अदितीच्या ऐवजी इंद्रानेच रोज इथे येऊन शिवाची पूजा करावी. इंद्राने त्यांचे सांगणे मान्य केले. तेव्हापासून इंद्र या ठिकाणी रोज येऊन अमृतघटेश्वराची पूजा करू लागला.
एकापेक्षा एक सरस अशा कथांमुळे मेलकडंबुर इथले हे अमृतघटेश्वर मंदिर जास्तच रमणीय झाले आहे. रथाच्या आकाराचे असलेले हे मंदिर. या मंदिरावर असलेल्या रथचक्रांपैकी डाव्या बाजूचे एक चाक हे जमिनीत रुतलेले आहे. वर सांगितलेल्या कथेत गणपतीने रथ दाबून धरला होता, त्याचा संदर्भ इथे दिसतो. सगळे मंदिर विविध शिल्पांनी नटले आहे. मंदिराच्या शिखरावर शिवाची दक्षिणामूर्ती कोरलेली आहे. शिवाय पतंजलीची मूर्ती इथे असणे हे एक विशेष आहे. या मंदिराबद्दलची अजून एक समजूत म्हणजे नवग्रह या ठिकाणी शिवाची पूजा करण्यासाठी त्यांच्या दिवशी येऊन जातात. त्यामुळे इथे महादेवाला रोज त्या त्या ग्रहांच्या रंगाचे वस्त्र्ा परिधान केले जाते. कुठल्याही ग्रहाच्या पीडेने त्रस्त असलेले भाविक या ठिकाणी येऊन शिवलिंगाची पूजा करतात. मंदिर प्राकारात देवीच्या मंदिरासमोरच नवग्रहांचे मंदिर आहे. मंदिर प्राकारामध्ये देवी पार्वतीचे मंदिर असून इथे देवी पार्वती ही ‘विद्युतज्योती नायकी’ या नावाने पूजली जाते. या ठिकाणी पार्वती ‘विद्या-सरस्वती’, ‘ज्योती-महालक्ष्मी’ आणि ‘नायकी-दुर्गा’ अशा तीन शक्तींचे एकत्रित स्वरूप आहे असे समजले गेले आहे. त्यामुळे देवीची सकाळची पूजा ही वीणेसह सरस्वतीच्या रूपात, दुपारची पूजा ही हत्तीसह लक्ष्मीच्या रूपात आणि संध्याकाळची पूजा ही त्रिशूळधारी दुर्गेच्या रूपात केली जाते.
मेलकडंबुर इथल्या मंदिरात असलेली नटेशाची अत्यंत देखणी मूर्ती हे इथले एक महत्त्वाचे मूर्तीविशेष. ‘दशभुज वृषभ तांडव मूर्ती’ असे याला म्हणतात. ही मूर्ती बंगालच्या पाल राजवटीमधील आहे. चोळ सम्राट राजेंद्र चोळ पहिला याने बंगालपर्यंत धडक मारली होती, तेव्हा त्याने विजयाची स्मृती म्हणून ही मूर्ती इकडे आणली. त्याला ही नटराजाची मूर्ती गंगैकाsंडचोळपुरम इथल्या मंदिरात प्रस्थापित करायची होती, मात्र तेव्हाच्या धर्मपीठाने त्याला तसे करण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे ही मूर्ती मेलकडंबुर इथल्या लहान मंदिरात आणून ठेवली गेली. या मूर्तीचे रोज दर्शन होत नाही म्हणून त्या मूर्तीचे मोठय़ा आकारतील एक प्रकाशचित्र इथे मंदिरात ठेवले आहे. महिन्यातून एकदाच ‘प्रदोष’ तिथीला म्हणजेच महिन्याच्या ‘शुद्ध त्रयोदशीला’ या मूर्तीचे दर्शन होऊ शकते. अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ऐवज असलेली ही मूर्ती फारच देखणी आहे.
आकाराने काहीसे लहान असलेले हे मंदिर, मूर्तीकला, इतिहास आणि सुंदर अशा आख्यायिका यांनी मात्र संपन्न आहे. मंदिर परिसरसुद्धा खूपच शांत आणि रमणीय आहे. गंगैकाsंडचोळपुरमच्या जवळ असलेले हे ठिकाण चोळांच्या प्रदेशात हिंडताना मुद्दाम वाट वाकडी करून अगदी आवर्जून बघायला हवे. इथे येताना मंदिराची वेळ लक्षात ठेवायला हवी. तामीळनाडूमधल्या इतर मंदिरांसारखे हे मंदिरसुद्धा दुपारी 12 ते 5 या वेळात बंद असते.



























































