
सत्यजित रे यांचा एक कथासंग्रह सध्या वाचत आहे. गूढ आणि उत्कंठा वाढवणाऱ्या अशा या कथा आहेत. खूपच इंटरेस्टिंग आहेत. एका वेगळ्या पद्धतीचे लेखन करणारे सत्यजित रे यातून भेटतात. मी कथासंग्रह जास्त वाचतो. कारण मी एकाच वेळी दोन ते तीन पुस्तपं वाचत असतो.
काही पुस्तकं पुनः पुन्हा वाचवीशी वाटतात. अशी खूप कमी पुस्तकं आहेत, जी पुन्हा वाचावीशी वाटतात. प्रत्येक वेळी वाचताना त्यातून नवं काहीतरी गवसतं. ‘कोसला’ हे असंच पुस्तक आहे. दि. बा. मोकाशींचा ‘आदिकथा’ हा असाच कथासंग्रह आहे. ‘बर्डस्, बीस्ट अँड बँडिटस् – फोर्टिन डेज विथ वीरप्पन’ हे कृपाकर आणि सेनानी या वाइल्डलाइफ फोटोग्राफर्सचे पुस्तक खूप आवडले. वीरप्पन या कुख्यात चंदन तस्कराने या दोन फोटोग्राफर्सना सरकारी अधिकारी समजून त्यांचे अपहरण केले. अपहरण झाल्यानंतरच्या 14 दिवसांत तिथे नेमपं काय घडलं, वीरप्पनचे सोबती कसे आहेत, त्यांची कामाची पद्धत, जंगलातील वातावरण याबाबत सांगणारं हे पुस्तक नक्कीच रंजक आहे. कवितासंग्रह वाचायलादेखील आवडतं. यात विशेषकरून अरुण कोलटकर यांच्या कविता मनाला स्पर्श करणाऱया आहेत. त्या जितक्यांदा वाचू तितक्यांदा त्यातला नवा अर्थ आपल्याला उमगत जातो. ‘कोसला’बाबतही हेच म्हणेन. ‘कोसला’ कादंबरीने मराठी साहित्य जगताची भाषा बदलली असं म्हणावे लागेल. ‘कोसला’तील ही भाषा मला पहिल्यांदा पुस्तक वाचलं तेव्हाच भावली. माझं शिक्षण बोर्डिंगमध्ये झालं असल्याने ती भाषा, ते वातावरण माझ्याशी जवळीक साधणारं वाटतं मला.
भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, अण्णाभाऊ साठे वा दि. बा. मोकाशी या सर्व लेखकांनी, कवींनी महाराष्ट्रातील सर्व प्रांत, तिथली बोली, चालीरीती, प्रथा, भाषा यांना एका समान प्रतलावर आणलं आणि ते वाचक म्हणून माझ्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी साहित्यात आणलेली ही सर्वसमावेशकता खूप भावणारी आहे. अगदी अरुण कोलटकर यांच्या ‘चिरीमिरी’सारख्या कथासंग्रहात आपल्याला अशाच अनेक वेगवेगळ्या परिघातील व्यक्ती भेटतात. त्यांचा ‘भिजकी वही’ हा कवितासंग्रह माझा अतिशय आवडता आहे. या कवितांचा आवाका खूप मोठा आहे. लोककथा, पुराणकथेचा संदर्भ या कवितांना देताना त्यांनी वेगवेगळी संस्कृती, साहित्य यांना स्पर्श केला आहे.
वेगळी बोली, भाषा असणारी भूमिका जेव्हा कलाकाराकडे येते तेव्हा केवळ तितकाच सराव करून भागत नाही, तर त्यासाठी त्या समाजाची, त्या विशिष्ट भागची जडणघडण कशी आहे हे अभ्यासणं गरजेचं असतं. ‘टर्री’ या माझ्या आगामी चित्रपटासाठी नगरी बोली, भाषा, तिथला भाग समजून घेताना मला अशा पुस्तकांचा नक्कीच फायदा झाला. एक अभिनेता म्हणून माझ्या वाटय़ाला आलेल्या भूमिकेला, पात्राला समजून घेताना असं विविधांगी केलेले वाचन उपयोगी ठरते. एक कलाकार म्हणून ही पुस्तपं माझ्या जाणिवा समृद्ध करतात.
शब्दांकनः शुभांगी बागडे

























































