
‘माझ्या बंदोबस्तात का वाढ केली, हे मलाही माहिती नाही. यासंबंधी तुम्ही पोलिसांना विचारा. कदाचित तुम्ही माझ्यावर हल्ला कराल म्हणून बंदोबस्त वाढवला असेल,’ अशी मिश्कील टिप्पणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
बारामतीत जनता दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गत आठवडय़ात बारामतीत त्यांच्याच निवासस्थानासमोर पुतळा जाळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यात पोलिसांकडून सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी त्यांनाच गुगली टाकली.
‘त्या’ वक्तव्याबाबत दिलगिरी
माझ्याकडून शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलत असताना चुकून सावित्रीबाई फुलेंऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला. बोलण्याच्या ओघात ते घडले; त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या मराठी संस्कृतीत वडीलधाऱ्यांनी आपल्याला जेथे चूक होते, तेथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायची शिकवण दिली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.





























































