पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध येण्यासाठी कायदा करण्याची गरज, सुजय विखेंचे खळबळजनक वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe-patil

ज्या पद्धतीने नवी पिढी 18 वर्षांच्या पुढची सुशिक्षित मुले आणि मुली हे आपल्या आई-वडिलांच्या मनविरहित पळून जाऊन लग्न करत आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध येण्यासाठी कायदा व्हावा, असे खळबळजनक वक्तव्य भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी देत असताना, त्याच सरकारमधील खासदाराने असे वक्तव्य केल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खासदार डॉ. विखे म्हणाले, पळून जाऊन लग्न करण्याच्या नगर जिह्यामध्ये महिन्याला जवळपास दीडशे केसेस आढळून येत आहेत. हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आई-वडिलांचा मुलांवर-मुलींवर आणि मुला-मुलींचा आई-वडिलांवरील विश्वास कमी होत आहे. हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. त्यामुळे या प्रकरणांना आळा बसण्याची गरज आहे. ‘लव्ह जिहाद’ हा एक त्यातलाच घातक प्रकार आहे. त्यामुळे पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध आणण्यासाठी एखादा कायदा यावा, असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन चित्रपट क्षेत्रातील कलाकारांशी बैठक केली, यावरून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये जाईल, या चर्चेला उधाण आले आहे. यावर खासदार विखे म्हणाले, फिल्म इंडस्ट्री कोणी कुठेही पळून घेऊन जात नाही. अनेक चित्रपटनिर्माते बाहेरच्या देशात जाऊन शूटिंग करतात, मग काय ते तिकडेच स्थायिक होत नाही. शेवटी त्यांनी केलेल्या व्यवसायातून सरकारला मिळालेले उत्पन्न हे केंद्राच्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारलाच मिळणार आहे. डॉक्टर या नात्याने मी माझा व्यवसाय चांगला करत होतो. मात्र, जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडावी लागत आहे, असेही खासदार डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले.