बोठेला आश्रय देणाऱया वकिलाला गुन्ह्यातून वगळण्यावर 17 जानेवारीला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी क्रमांक 7 ऍड. जनार्दन अंकुला चंद्राप्पा याच्यावर मुख्य आरोपी बाळ बोठे याला आश्रय दिल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यातून आपणास वगळावे, असा युक्तिवाद जनार्दन चंद्राप्पा याच्या वतीने शनिवारी न्यायालयात करण्यात आला. यावर 17 जानेवारी रोजी निर्णय दिला जाणार आहे.

ऍड. जनार्दन चंद्राप्पा याच्या वतीने ऍड. महेश तवले यांनी युक्तिवाद केला. ‘‘बोठे हा हैदराबादला न्यायालयामध्ये आपल्याकडे ज्युनियरशिप करण्यासाठी आला होता. याबाबत न्यायालयातील रेकॉर्डलाही आपण नोंद केलेली आहे. बोठे याची त्या ठिकाणी इतर आरोपींशी ओळख झाली. त्यांनीच बोठेला मोबाईलचे सिम कार्ड उपलब्ध करून दिले आहे. बोठे हॉटेलमध्ये राहिला होता. या हत्याकांडाची आपल्याला माहिती नव्हती,’’ असा बचाव ऍड. जनार्दन चंद्राप्पा याच्या वतीने करण्यात आला आहे.

जरे यांच्या वतीने ऍड. सचिन पटेकर यांनी हे म्हणणे खोडून लावले. बोठे याने हैदराबाद येथे वकिली व्यवसाय करण्यासाठी त्या राज्याच्या बार कौन्सिलकडे नोंदणी केलेली नाही. एखादा कायद्याची पदवी घेणारा महाराष्ट्रातून थेट हैदराबादला कसा येतोय? याला शंका घेण्यासाठी पुरेसे कारण आहे. हत्येच्या घटनेची माहिती असूनही चंद्राप्पाने बोठेला आश्रय दिला आहे. त्यामुळेच त्याला मोबाईल सिम कार्ड उपलब्ध झाले आहे. चंद्राप्पाकडे ज्युनियरशिप करणारी वकील पी. लक्ष्मी ही फरार का आहे? असे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यामुळे चंद्राप्पाला या गुह्यातून वगळू नये, असा युक्तिवाद पटेकर यांच्या वतीने करण्यात आला.