महिलेशी झालेल्या गैरवर्तणुकीप्रकरणी एअर इंडियाला DGCA ची कारणे दाखवा नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाच्या विमानात महिलेसोबत झालेल्या गैरवर्तणुकीप्रकरणी DGCA ने कठोर भूमिका घेतली आहे. विमान कंपनीने वेळेत कोणतीही कारवाई न केल्याने तसेच विमान कंपनीने डीजीसीएने प्रश्न विचारल्यावर या प्रकरणाची माहिती दिली. या कारणास्तव डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये ‘तुमच्यावर कारवाई का करू नये?’ असे DGCA ने एअर इंडियाला म्हटले आहे.

26 नोव्हेंबर 2022 रोजी एका मद्यधुंद प्रवाशाने न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका महिला सहप्रवाशावर लघवी केली होती. पीडित महिला ज्येष्ठ नागरिक असून तिचे वय 70 पेक्षा जास्त आहे. बिझनेस क्लासमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी शनिवारी बेंगळुरू येथून अटक केली.

या प्रकरणात पीडित महिलेने सांगितले की, एअर इंडियाने तिला मदत केली नाही, उलट तिला जबरदस्तीने आरोपीसमोर बसवले. माफीनाम्याद्वारे प्रकरण संपविण्याचा एअर इंडियाकडून प्रयत्न करण्यात आला. आता सर्व युक्तिवाद लक्षात घेऊन डीजीसीएने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमच्यावर कारवाई का करू नये?, तुम्ही तुमची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही, असे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पाहता तुम्हाला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला जाईल. त्याआधारेच पुढील कारवाई केली जाईल. असे म्हटले आहे.