
वेरळ तर्फे वेसवीत कांदळवनाची बेसुमार कत्तल केली जात असून कांदळवन क्षेत्रात मातीचा भराव टाकून मोठया प्रमाणात कांदळवन क्षेत्र नष्ट केले जात आहे. ही बाब गंभीर असली, तरी याकडे वन विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे वन विभागाच्या आशिर्वादाने तर कांदळवनाची कत्तल केली जात नाही ना ? अशा प्रकारचा संषय व्यक्त केला जात आहे.
मंडणगड तालुक्यातील वेरळ तर्फे वेसवी या महसुली गावाच्या हद्दीत कांदळवन आणि सीआरझेड भागात मातीचा भराव करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. कायद्याने असलेली बंदी आणि उच्च न्यायालयाचा आदेश असूनही वेरळ तर्फे वेसवीत कांदळवनाची सर्रास कत्तल केली जात असून कांदळवनाचे क्षेत्र मातीचा भराव टाकून नष्ट केले जात आहे. याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंडणगड तालुक्यातील वेरळ तर्फे वेसवी या महसूली गावाच्या एका बाजूला मोठे खाडी पात्र असल्यामुळे या परिसरात कांदळवनाचे क्षेत्र मोठे आहे. कांदळवनापासून 50 मीटर क्षेत्रापर्यंत भराव, कचरा टाकणे आणि बांधकामे करण्यास मनाई आहे. कांदळवन आणि सीआरझेड पाणथळ परिसर गावाची कवच कुंडले असून भरती किंवा मोठा पाऊस आला तरी ते पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची या क्षेत्राची क्षमता मोठी आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी जागेतील कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड करून त्या क्षेत्रात भराव टाकण्याचे काम सर्रास केले जात आहे. कांदळवनाची बेसुमार कत्तल आणि कांदळवनाचे क्षेत्र मातीचा भराव टाकून नष्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई करून वन विभागाने आपले कर्तृत्व दाखवावे, अशी मागणी होत आहे.





























































