बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला वेग येणार, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा आढावा घेतला. या पुनर्विकासात बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले. बीडीडी चाळींच्या परिसरातील झोपडीधारकांना 269 चौरस फुटांऐवजी 300 चौरस फुटांची घरे देण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या वेळी म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी प्रकल्पाच्या कामाचे सादरीकरण केले. वरळी येथील 121 चाळींपैकी पहिल्या टप्प्यात 34 चाळी आणि 2520 गाळ्यांचा पुनर्विकास होत आहे, तर नायगाव येथील 42पैकी पहिल्या टप्प्यात 23 चाळी आणि 1824 गाळ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. ना.म. जोशी मार्ग येथील 32 चाळींपैकी पहिल्या टप्प्यात 16 चाळी आणि 1280 गाळ्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.