
पल्लवी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांनी भाग घेत आपली कला सादर केली. या विद्यार्थ्यांसाठी बालजल्लोषाचे आयोजनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडले. चित्रकला स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांना ‘पावनखिंड’ हा चित्रपटही दाखविण्यात आला.
चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य पुरविण्यात आले तसेच त्यांच्या अल्पोपहारासह दूरवर राहणाऱया विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती. सायंकाळी 5 वाजता बालजल्लोष कार्यक्रमांतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांसाठी घोडागाडी, बोटिंग, मिनी ट्रेन, मूनवॉकर तसेच मोठय़ा मुलांसाठी नेट क्रिकेट, भज्जी जम्पिंग तसेच नेमबाजी व इतर मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी खास पुस्तक प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीदेखील या पुस्तक प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. मुलांसाठी खास खाऊचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. पाणीपुरी, पॉपकॉर्न, आइसस्क्रिम, कॉटन पॅण्डी खाण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी लुटला. दैनिक ‘सामना’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम स्वरा जोशी हिच्यासह सुधीर मल्होत्रा, माया मल्होत्रा, श्रीनिवास नार्वेकर, प्रविणा मोरजकर, प्रसन्ना ताठरे, प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा परब आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक भाऊ कोरगावकर, अध्यक्षा शलाका कोरगावकर यांनी केले होते. हेमंत काळे, नीलेश कोरगावकर, पल्लवी पुजारी यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चिकणे, नयना परदेशी, शुभांगी मेमाणे यांनी केले.


























































