
>> दीपक वेलणकर
‘‘वेलणकर, येऊ दे बाटली बाहेर!’’ या वाक्यानं तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे विस्फारले आणि खिशातून मी अत्तराची कुपी बाहेर काढताच एकच खसखस पिकली. वरवर गंभीर वाटणाऱ्या मेहंदळे साहेबांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव लपत नव्हते. दूरदर्शन हे एकच माध्यम (आणि श्राव्य विभागात आकाशवाणी) असणाऱ्या त्या काळात वयानं आणि कर्तृत्वानं मोठय़ा ठरणाऱ्या अनेकांशी माझा दोस्ताना झाला. त्यातलं उल्लेखनीय नाव म्हणजे डॉ. विश्वास मेहंदळे.
वास्तविक मी वृत्तविभागात काम करत असल्यानं त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फारशी आली नाही. तरीही एखाद्या पावसापाण्याच्या दिवसांत पिंवा निवडणुका निकालांच्या दिवशी त्यांची काम करण्याची आखीव-रेखीव पद्धत अनुभवायला मिळाली. माझ्यासहीत बरेच नवखे तर सुरुवातीला त्यांच्याशी बोलायलादेखील घाबरत असत. त्यांचा गंभीर चेहरा हे एक कारण आणि दुसरं म्हणजे कामाची चोख नेटकी पद्धत, पण प्रत्यक्षात मेहंदळेसाहेब म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. कुणालाही मदत करण्यास सदैव तत्पर. काठावर राहून एखादा कसा फसतो याची वाट बघणारे लोकही आजूबाजूला होते आणि म्हणूनच मेहंदळेसाहेब त्यातून उठून दिसत. कृष्णधवल पडद्यावरचे त्यांनी सादर केलेले दर्जेदार कार्यक्रम पाहत मोठे झालेलो आम्ही, नकळत त्यांचे भक्त झालो ते त्यामुळेच. पुढे पहिल्या क्रमांकाचं यश मिळवून मी दूरदर्शनचा वृत्तनिवेदक होणार ही बातमीही त्यांनीच मला सांगितली, परंतु तो योग नव्हता. त्यानंतर खासगी उपग्रह वाहिनी सुरू झाली आणि त्यावर मी वृत्तनिवेदन करू लागलो. त्यावेळी दूरदर्शनच्या दोन ज्येष्ठांनी माझं खास फोन करून कौतुक केलं, पैकी पहिले होते प्रदीप भिडे आणि दुसरे डॉ. विश्वास मेहंदळे. त्यानंतर ती वाहिनी सोडून मला आंध्र प्रदेशातील एका वाहिनीकडून बोलावणं आलं. माझी द्विधा मनस्थिती झाली. मुलगी लहान होती नि नोकरी करणारी बायको एकटीनं तिला कसं सांभाळू शकेल? हा प्रश्न होता. शिवाय जातोय त्या वाहिनीत बस्तान बसलं नाही तर मुंबईत परतल्यावर पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार होती. अशा वेळी निर्णय घेताना मदत करतो तो गुरू.
मी पुन्हा मेहंदळेसाहेबांना फोन लावला (तेव्हा मोबाइल फोन प्रचलित झाले नव्हते. त्यामुळे STD लावावे लागत). मेहंदळे साहेब त्या वेळी त्याच समूहाच्या वर्तमानपत्रासाठी हैदराबाद इथून काम करत होते. ‘‘तू शक्य होईल तितका वेळ काढ. पुढच्या आठवडय़ात मी मुंबईला येतोय, तेव्हा बोलू!’’ मेहंदळे साहेबांच्या फोनवरच्या या दिलाशानं जीवात जीव आला. गणेशोत्सवाचे दिवस होते ते आणि मेहंदळे सर ‘मला भेटलेली माणसं’ हा एकपात्री कार्यक्रम करत असत. दादरमधला त्यांचा प्रयोग संपल्यावर मी सगळी कहाणी त्यांना सांगितली. मिळणारे पैसे, प्रसिद्धी, भविष्यातली संधी आणि अडचणीसुद्धा. आंध्र प्रदेशात जिथे ही वाहिनी कार्यरत होती तिथलं वातावरण, राहण्या-खाण्यापिण्याची सोय, तिथल्या पाण्यात असलेलं फ्लोराईडचं जास्त प्रमाण, त्याचा प्रकृतीवर होणारा विपरीत परिणाम, शिवाय ती वाहिनी म्हणजे सोन्याचा पिंजरा कसा आहे अशी बहुमितीय माहिती देऊन त्यांनी सल्ला दिला की, मुंबई सोडू नकोस. क्षणभर वाईट वाटलं, पण मी तो सल्ला मानायचं ठरवलं. पुढे काही दिवसांतच ही वाहिनीही बंद पडली. असे हे मेहंदळेसाहेब आता आपल्यात नाहीत ही कल्पना जीव कातर करते. काही लोक असे असतात की, ज्यांच्याशी आपलं रोज बोलणं होत नाही, भेटीगाठीही होत नाहीत, परंतु त्या व्यक्ती आजूबाजूला कुठेतरी आहेत आणि अडचणीत त्यांचा मदतीचा हात नक्की मिळेल असं आपल्याला वाटत राहतं. ती व्यक्ती गेल्यावर आधारहीन झाल्यासारखं वाटतं. आज मला असंच वाटतंय !
(लेखक वृत्तनिवेदक आणि आवाज प्रशिक्षक आहेत)


























































