
>> मंगेश वरवडेकर
मी धावतो माझ्या पॅशनसाठी, माझ्या फिटनेससाठी अन् माझ्या रोजीरोटीसाठी… मी कधीही कोणतीही मॅरेथॉन जिंकण्यासाठी धावलेलो नाही. मला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठी कामगिरी करायचीय, असेही माझे ध्येय नाही. पण मुंबई मॅरेथॉन येताच पायात बूट घालून धावणाऱया हौशी आणि सातत्याने सराव करणाऱया धावपटूंना योग्य मार्गदर्शन करून त्यांना मॅरेथॉनपटू बनविणे हेच माझे ध्येय आहे आणि आगामी काळात मला माझ्या या ध्येयाला वेग द्यायचाय, अशी प्रामाणिक इच्छा बोलून दाखवलीय अनवाणी मॅरेथॉन धावणाऱया धावपटू सूरज चौहानने.
सूरज चौहानचा न संपणारा संघर्ष पाहिल्यावर, ऐकल्यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही की ही वयस्कर वाटणारी व्यक्ती मॅरेथॉनपटू आहे आणि एकदोन नव्हे तर चक्क 134 मॅरेथॉन धावलीय, तीसुद्धा अनवाणी. 2015 सालापासून तो मुंबई मॅरेथॉनमध्ये पूर्ण मॅरेथॉन धावतोय आणि चांगल्या वेळेत पूर्ण करतोय.
तिसरीपर्यंत शिक्षण
एखादी व्यक्ती कोणतेही शिक्षण नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसतानाही उत्कृष्ट प्रशिक्षण देऊ शकते, मार्गदर्शन करू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे सूरज चौहान. 30 वर्षांपूर्वी मुंबईत आलेल्या सूरजने सर्व प्रकारची कामे केली. काही काळ तो शिपाई म्हणून काम करत होता तेव्हा तो आपल्या मालकांच्या कुत्र्यांना फिरविण्यासाठी रेसकोर्सला घेऊन यायचा. त्यादरम्यान त्याने रेसकोर्सवर आपल्या फिटनेससाठी कसरती सुरू केल्या. मग तो बघून बघून योगासने शिकला, व्यायाम शिकला. व्यायामासोबत करायच्या स्ट्रेचिंग शिकला. तो बघता बघता हे सारे शिकला आणि त्याचे बघून लोक त्याच्याकडे शिकायला येऊ लागले आणि सूरजचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला.
म्हणून अनवाणी धावतो…
मला लहानपणापासून बूट घालून धावताच येत नाही. आताही मी अनेकदा शूज घालून धावण्याचा सराव केला, पण मला माझ्या वेगाने धावताच येत नव्हते. म्हणून आजवर सर्वच्या सर्व मॅरेथॉनमध्ये मी अनवाणीच धावतोय. अनवाणी धावण्यामुळे माझ्या टाचेला अनेकदा इजाही झालीय, पण मी कितीही वेदना झाल्या तरी शर्यत पूर्ण करतोच.
सूरज अशिक्षित, पण मुलांना उच्च शिक्षण
सूरजला परिस्थितीमुळे शिकता आले नाही, पण त्याने हलाखीची परिस्थिती असूनही आपल्या चारही मुलांना उच्चशिक्षित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे आणि तो त्यांना तसे शिक्षणही देतोय. चार पुत्रांचा पिता असलेल्या सूरजच्या मोठय़ा मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झालेय तर मुलगा कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंग करतोय. दोन धाकटय़ा मुलांचे शालेय शिक्षण सध्या सुरू आहे.
हौशींना शिकवायचेय…
माझे धावणे तर सुरूच राहणार, पण माझ्या धावण्यामुळे प्रेरित होऊन महालक्ष्मी रेसकोर्सवर अनेक हवशे-नवशे धावायला सुरुवात करताहेत, पण माझी सर्वांना नेहमीच विनंती असते, सरावाशिवाय कुणीही मॅरेथॉनमध्ये धावू नये. सरावाशिवाय धावणे जिवावर बेतू शकते. अशा हौशींना मी नेहमीच मार्गदर्शन देतो. आज रेसकोर्सवर सराव करणारे शंभरपेक्षा अधिक धावपटू मॅरेथॉनमध्ये विविध गटांत धावणार आहेत, पण मला हजारोंना धावण्याची-फिटनेसची सवय लावायचीय. जेव्हा रेसकोर्सवर सरावाला येणाऱयांपैकी शेकडो धावपटू मॅरेथॉनमध्ये तयारीनिशी धावतील, तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल. मला जिंकण्याची इच्छा नाही, पण मला जिंकण्यासाठी खेळणारा एकही खेळाडू घडवता आला तर मी त्याला माझे भाग्यच समजेन.

























































