चेंबूर येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत रामेश्वरमचा सलग दुसरा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर येथे सुरू असलेल्या 37व्या डिपार्टमेंट ऑफ ऍटॉमिक एनर्जी (डीएई) चषक क्रिकेट स्पर्धेत ‘ब’ गटाच्या लढतीत रामेश्वरम संघांने द्वारका संघाचा 7 गडी राखून आरामात पराभव करून आपला सलग दुसरा विजय मिळवला. तर ‘अ’ गटातील झालेल्या आणखी एका सामन्यात पुष्कर संघाने कोणार्कचा 47 धावांनी सहज पराभव करून स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. अणुशक्ती नगर येथे झालेल्या लढतीत रामेश्वरमने नाणेफेक जिंकून प्रथम द्वारका संघाला फलंदाजी दिली. त्यांचा हा निर्णय चांगलाच फलदायी ठरला. प्रतिस्पर्धी द्वारका संघाचा डाव 18.4 षटकांत 80 धावांत गडगडला. त्यांच्या अंकुश नाईकने 22, नुरत 14, परमजीत हुडाने 13 धावा केल्या. त्यांच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्यादेखील काढता आली नाही. रामेश्वरमतर्फे किनोदकुमारने 4 आणि एम. सतीशने 2 बळी घेऊन द्वारका संघाची दाणादाण उडवली. रामेश्वरमने विजयी लक्ष्य 15 व्या षटकांत 3 गडी गमावून सहज पार केले. त्यांच्या संतोष एमने 38 चेंडूंत 5 चौकार मारून 46 धावा केल्या. पराभूत संघाच्या नितीन परदेशीने 2 बळी टिपले.