पुणे शहरात ऑपरेशन ऑलआउट…साडेतीन हजारांवर गुन्हेगारांची झाडाझडती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा ऑपरेशन ऑलआउट राबविण्यात आले. त्यानुसार गुरूवारी रात्री नउ ते दोन वाजेपर्यंत तब्बल 3 हजार 683 गुन्हेगारांची झाडाझडती घेउन ७०९ जणांना अटक केले. मागील 15 दिवसांमध्ये तीन वेळा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचसह सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाला पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

 शहरातील कायदा सुव्यवस्थेसह प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी पुणे पोलिसांकडून ऑपरेशन ऑलआउट राबविण्यात आले. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेतील विविध पथकांनी गुरूवारी (दि. १९) रात्री नउ ते पहाटे दोन वाजेपर्यंत सर्च मोहिम राबवून 709 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामध्ये आर्म अ‍ॅक्टप्रमाणे 37 जणांना अटक करून त्यांच्याकडून 27 कोयते, तीन तलवारी, दोन चाकू असा शस्त्रसाठा जप्त केला. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी शहरभरात मोहिम राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. पोलिसांकडून 532 हॉटेल, ढाबे, लॉजेस तपासण्यात आले. तसेच 171 बसथांबे, रेल्वेस्थानक, एसटी स्थानकावर गस्त घालण्यात आली.

 पोलिसांकडून नाकाबंदीदरम्यान 1 हजार 446 संशयित वाहन चालकांना अडवून तपासणी करण्यात आली. त्याशिवाय वाहतूक विभागाकडून 1 हजार 22 संशयित वाहनचालकांना अडविण्यात आले. त्यापैकी 115 जणांकडून 75 हजारांची दंडवसुली करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर आयुक्त रंजन शर्मा, अपर आयुुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुहैल शर्मा, उपायुक्त, शशिकांत बोराटे, उपायुक्त विक्रांत देशमुख, वाहतूक उपायुक्त विजय मगर , एसीपी गजानन टोम्पे, एसीपी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने केली.

शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारांची झाडाझडती करण्यात येत आहे. त्यामुळे तपासणीदरम्यान पोलिस रस्त्यावर असल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही कमी असते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून वेळोवेळी ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

– रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर