
ज्या एका व्यक्तीच्या धडपडीमुळे, पाठपुराव्यामुळे खो-खोपटूंना रेल्वेत नोकरी लाभली, क्रीडाविश्वात अभिमानाने जगता आले, स्वतःची ओळख निर्माण करता आली ती व्यक्ती म्हणजे माजी खासदार मोहन रावले. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेतील सर्व खो-खोपटू एकत्र येऊन राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करताहेत. परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या सहकार्याने पश्चिम रेल्वेतील सर्व खो-खोपटू स्वतःच्या खिशात हात घालून येत्या 22 ते 26 जानेवारीदरम्यान दिमाखदार आणि दर्जेदार स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
आजवर विद्यार्थी क्रीडा केंद्राच्या माध्यमातून खो-खोतील अनेक प्रयोग यशस्वीपणे घेण्यात आले. त्याच विद्यार्थी क्रीडा पेंद्राने रेल्वे खो-खोपटूंच्या माध्यमातून एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजनाची तयारी केली आहे. दिवंगत खासदार मोहन रावले यांनीच तळमळीने खो-खोपटूंसाठी लढा उभारल्यामुळे खो-खोला रेल्वेत झेप घेता आली आणि खो-खोचा एक बलाढय़ संघ रेल्वेत जन्माला आला. रावलेंच्या याच क्रीडाप्रेमाला सलाम ठोकण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही सर्व पश्चिम रेल्वेतील खो-खोपटू एकत्र आलो असल्याचे राष्ट्रीय खो-खोपटू स्वप्नील परबने अभिमानाने सांगितले. आम्ही सर्व खो-खोपटू मिळून मोहन रावले स्मृती चषक स्पर्धेत खेळाडूंवर लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव करणार आहोत, असे त्याने सांगितले. सर्व खो-खोपटूंनी बक्षिसांचा सर्व खर्च उचलला असून स्पर्धेच्या देखण्या आयोजनासाठी राजकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातूनही निधी गोळा करण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. ही स्पर्धा क्रीडा जगतासाठी एक आदर्श असेल, असा दृढविश्वासही सर्व खो-खोपटूनी व्यक्त केला. त्यामुळे परळच्या लाल मैदानात एक जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळेल, असा अंदाज खो-खोपटूंनीच व्यक्त केला आहे.
ही स्पर्धा दर्जेदार आणि संस्मरणीय व्हावी म्हणून पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, महावितरण, मुंबई पोलीस, नव महाराष्ट्र संघ (पुणे), संस्कृती (नाशिक), धाराशीव, महात्मा गांधी अॅपॅडमी, विहंग (ठाणे) असे एकापेक्षा एक अशा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. या स्पर्धेला आधुनिकतेची जोड लाभणार आहे.


























































