कवडसे – स्वप्नपाखरं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

परवा तू पहाटे स्वप्नात आलीस अचानक…आणि मी तुला सांगितलं तेव्हा तू विचारलं नाहीस मला की, काय पाहिलं स्वप्नात …आणि मीही काही बोललो नाही…काही सांगितलं नाही. कधी कधी काही गोष्टी न सांगता समोरच्या व्यक्तीला कळाव्यात असं वाटतं, तसंच काही मलाही वाटलं त्या क्षणी, पण तुला काय वाटलं याचा विचार मी केला नाही. मला जे स्वप्न पडलं ते तू कल्पना करून ओळखावंस आणि मनातल्या मनात जागेपणी पाहिलेलं स्वप्न म्हणून आयुष्यभर उराशी जपून ठेवावंस असं मला वाटलं.

नंतर मी विचार करत राहिलो काही वेळ. जे स्वप्न मी पाहिलं तेच हुबेहूब तू कल्पना करशील का. मी स्वप्नात ज्या वाटेवर चालत गेलो, त्याच वाटेवर तूही चालत येशील का? …आणि तूही तेच क्षितिज शोधशील का, जे शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो याच स्वप्नांच्या वाटेवर येऊन. मला ते सापडेल की नाही कुणास ठाऊक, तुलाही सापडणार नाही कदाचित…पण तू प्रयत्न करून बघ. कारण जर तुला ते क्षितिज सापडलं तर आपली गोष्ट पूर्ण होईल. कारण कधी कधी काही स्वप्नंसुद्धा क्षितिजासारखी असतात. जी दिसतात, भासतात पण कधी पूर्ण होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार मनाला नाही, असे बुद्धी सांगत असते. पण मन तिचं ऐकून घेत नाही. कारण मनाचं अस्तित्व हे स्वप्नांवर अवलंबून असतं… कारण मन हे अथांग सागर आणि स्वप्नं म्हणजे त्यातील थेंब असतात. तुझ्या मनातसुद्धा असंच एक जग असेल का, जे माझ्या मनात आहे…आणि जर असेल तर तुझ्या मनातील स्वप्नपाखरं कधीतरी माझ्या मनाच्या स्वप्नपाखरांना येऊन भेटत असतील का? आणि त्यांच्या कधी गप्पा होत असतील का? काही पाखरं अदलाबदली होऊन सारखीच स्वप्नं तुला मला दाखवत असतील का…असे किती प्रश्न माझ्या मनात घोंगावत आहेत. तुझ्या मनात आता काय सुरू असेल? असेच प्रश्नांचे वादळ तुझ्याही मनात असेल तर आपलं क्षितिज एकच आहे असं समजून जा आणि तूही चालत रहा, मीसुद्धा चालत राहतो. तो भेटीचा क्षण केव्हा? कधी? कुठे येईल? हा विचार करू नकोस. फक्त चालत रहा. कुठल्यातरी वळणावर आपण नक्कीच भेटू आणि तोच बिंदू आपलं क्षितिज असेल. क्षितिज कधीच गवसत नाही असं म्हणतात, पण आपण मात्र शोधू या. स्वप्नं काही पूर्ण होतात तर काही पूर्ण होत नाहीत. पण तोवर आपण स्वप्नं पाहूया. तुझ्या स्वप्नात मी येऊन काय पाहिलं आणि माझ्या स्वप्नात तू आलीस तेव्हा काय पाहिलं, याचा शोध घेत राहू. कधीतरी उत्तर सापडेल तुला किंवा मला पण उत्तर सांगण्याची घाई करू नकोस. उत्तर तिथेच सांग, ज्या क्षितिजावर आपण भेटू तेव्हा.

z [email protected]