शिर्डीतील ‘व्हीआयपी दर्शनपास’चा गोरखधंदा होणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईबाबांचे ‘व्हीआयपी दर्शन’ घडवून देणारे एजंट आणि बोगस पीएंना आता चाप बसणार आहे. आमदार, खासदार, विश्वस्तांचे बोगस पीए आणि एजंटांना साईमंदिर परिसरात ‘नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. साईदर्शनासाठी येणाऱया भक्तांना ‘व्हीआयपी दर्शन’ घडवून देण्याच्या नावाखाली अनेक पीएंचे आर्थिक लागेबांधे असल्याचे निदर्शनास आल्याने साईबाबा संस्थानने कठोर निर्णय घेतला आहे. आजी-माजी मंत्री, आमदार, विश्वस्तांना आता आपल्या पीएंच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र साई संस्थानला द्यावे लागणार आहे.

शिर्डीतील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त येत असतात. सामान्यांपासून नेते, अभिनेते, उच्चपदस्थ अधिकारी साईदरबारी हजेरी लावत असतात. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी साईबाबा संस्थान ‘व्हीआयपी दर्शन’ व्यवस्था करीत असते. यातूनच आता गोरखधंदा सुरू झाल्याचा प्रकार जिह्याचे प्रधान न्यायाधीश तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या लक्षात आला होता. त्यानुसार त्यांनी संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

साईमंदिरात असणाऱया जनसंपर्क कार्यालयातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ‘पेड व्हीआयपी दर्शनपास’ दिला जातो. त्यातून झटपट दर्शन घडवून दिले जाते. मात्र, अनेकजण ‘अतिमहत्त्वाच्या व्यक्ती’च्या नावाने बोगस शिफारस देऊन पास मिळवितात. आजी-माजी मंत्री, आमदार, विश्वस्तांनी आपल्या स्वीय सहायकाची शिर्डीत नेमणूक केली आहे. यांतील अनेक पीएंनीही आपली माणसे नेमली आहेत. ही माणसे काही हॉटेलचालकांशी असलेल्या लागेबांध्यांतून झटपट ‘व्हीआयपी दर्शन’ घडवून देत असून, त्यातून आपले खिसे भरत आहेत. मात्र, आता आजी-माजी मंत्री, आमदार, विश्वस्तांना आपल्या पीएंच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र साई संस्थानला द्यावे लागणार आहे. शिवाय दोन दिवस अगोदर शिफारस करणाऱयालाच व्हीआयपी पास देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. त्यामुळे आर्थिक संबंधातून विकल्या जाणाऱया व्हीआयपी पासेसना पायबंद बसणार आहे.

कठोर अंमलबजावणी करण्याची अपेक्षा

 साईमंदिर प्रशासनाने मंदिरात हार, फुले घेऊन जाण्यास बंदी घातलेली आहे. त्यानंतर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने साईमंदिराच्या बाहेर भक्तांची लूट करणाऱया पॉलिसी करणाऱयांवरही कडक कारवाई केली आहे. त्यामुळे आता शिर्डीतील गुन्हेगारीवरही बराच अंकुश आला आहे. साईबाबा संस्थानने घेतलेल्या निर्णयाचे शिर्डी ग्रामस्थांनी स्वागत केले असून, त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.