
लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद विरोधातील कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईत सकल हिंदू समाजाकडून आज हिंदू जन आक्रोश मार्चा काढण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार मैदान असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिंदे गट व भाजपचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या जिह्यात मोर्चे काढण्यात येत आहेत. यापूर्वी नाशिक, पुसद, पिंपरी-चिंचवड, अमरावती अशा विविध ठिकाणी मोर्चा काढल्यानंतर रविवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील मोर्चावर प्रतिक्रिया देताना हिंदूंचे राज्य आले असे सांगूनही स्वत:ला हिंदू समजणाऱया नेत्यांकडून न्याय मिळत नाही म्हणून आक्रोश मोर्चे निघत आहेत, अशी टीका केली. शिवसेना भवनासमोरील या आक्रोश मोर्चाच्या फोटोसह त्यांनी ट्विटच्या माध्यमातूनही या मोर्चावर निशाणा साधला.



























































