खिशातून पैसे काढताना विरोध केल्यामुळे डोक्यात फोडली बाटली, खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खिशातून पैसे काढण्यास विरोध केल्याचा राग आल्यामुळे तरूणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून खुनाचा प्रयत्न करणार्‍या तिघांना वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 30 जानेवारीला मध्यरात्री अडीचच्या सुमारास कर्वेनगरमध्ये घडली.

सौरभ सुनील पवार (32), राहुल गणेश चव्हाण (31), कुमार हिरामण चव्हाण (वय 31 तिघेही रा. गोसावी वस्त, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुषार ज्ञानदेव धनवटे (वय 23, रा. इंगळे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) हल्ल्यात जखमी झाले असून त्यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार आणि त्याचा मित्र अमित कर्वेनगर येथील मावळे आळी येथून मावशीच्या घरी बोळातून जात होते. त्यावेळी तिघा आरोपींनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. आरोपीने तुषारच्या खिशातून जबरदस्तीने 960 रूपये काढून घेतले. त्यावेळी तुषारने विरोध केल्याने हल्लेखोरांनी तुषार यांच्या डोक्यात बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी केले. लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.याप्रकरणी वारजे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.