
मागील एका वर्षापासून मुंबई महापालिकेत प्रशासक व प्रशासन अंदाधुंद कारभार चालवून मुंबईकरांच्या पैशाचा चुराडा करीत आहेत. हे थांबवलेच पाहिजे. महापालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या प्रकल्पांसाठी तरतूद नको. फक्त आस्थापना आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठीच आर्थिक तरतूद करावी, असे परखड मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ‘वेध’ या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हल-2023’ आणि ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या दालनाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
येत्या शनिवारी सादर होणाऱ्या मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका प्रशासकांच्या मनमानी कारभारावर तोफ डागली.
आदित्य ठाकरे यांनी यंदा हंगामी बजेट सादर व्हावे अशी मागणी केली. ते म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधी आणि मुंबईकर म्हणून माझी ही इच्छा आहे. सर्व मुंबईकरांनाही हेच वाटत आहे. कारण मुंबईकरांचा हक्काचा पैसा आहे; पण आताची परिस्थिती पाहिली तर महापालिका व राज्यात हुकूमशाहीचे वातावरण आहे.’
विधान परिषद निवडणुकीत नाशिकमधील उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पराजयाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. आता निवडणुकांना सामोरे जाण्याची हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिका किंवा राज्यातील इतर महानगरपालिका किंवा चाळीस गद्दारांच्या मतदारसंघातील निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात.’
नागपूरमधील भाजपच्या पराभवाबद्दल बोलताना, ’महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. आता इतर महापालिकांमध्ये निवडणुका घ्याव्यात.’ असे उघड आव्हान यावेळी आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिले.
गुजरातला ‘थँक्स गिंव्हिंग’
पेंद्रीय अर्थसंकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘गुजरातला ‘थँक्स गिव्हिंग’ची भेट मिळाली आहे. आपल्याकडून गुजरातला उद्योग पळवले. आर्थिक पेंद्र पळवले. आता सुरतमध्ये डायमंड लॅब येत आहे. वास्तविक, मुंबई हे देशाचे आर्थिक पेंद्र आहे. डायमंड बोर्ड मुंबईत आहे, मग डायमंड लॅब मुंबईत का नाही असा सवाल त्यांनी केला.
निवडणुकीसाठी कर्नाटकला पैसा दिला
कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथील सत्ताधारी पक्षाला विजय दृष्टिपथात दिसत नाही. म्हणून तेथेही पैसे दिले जात आहेत.’ असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात आणून बसवले आहे. मग मुंबई व महाराष्ट्राला का निधी देत नाही, असे ते म्हणाले.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लोकशाहीच्या हिताचा असावा. पालिकेची आस्थापना व सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांसाठीच तरतूद करावी. प्रशासक व प्रशासनाने स्वतःला लोकप्रतिनिधी समजू नये. राजकारणी बनू नये. नवीन प्रकल्पांसाठी प्रशासक पैसा देऊ शकत नाही. तो त्यांचा अधिकारही नाही.





























































