
तोंडावर मास्क व डोक्यात हेल्मेट घालून आलेल्या चोरटय़ांनी नगर शहरात दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले. तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत. महिलांचे दागिने चोरणारी हेल्मेट गँग सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
लता मच्छिंद्र तुपे (वय 70, रा. पाइपलाइन रोड, सावेडी) या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेले आणि डोक्यात हेल्मेट घातलेले व तोंडाला मास्क असलेल्या दोन चोरटय़ांनी लता तुपे यांना येथे किराणा दुकान कुठे आहे, असे विचारले. मला माहिती नाही, मी येथे राहत नाही, असे तुपे यांनी सांगताच ते पुढे जाऊन पुन्हा मागे आले व त्यांनी तुपे यांच्या गळ्यातील 12.5 तोळ्याची सोन्याची चेन ओरबडून धूम ठोकली. याप्रकरणी तुपे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगरकर मळा परिसरात एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 13 ग्रॅमची सोन्याची चेन चोरून नेली. त्या चोरटय़ांनी तोंडावर मास्क घातले होते. याप्रकरणी अनिल बाबुलाल कटारिया (वय 55, रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल कटारिया यांचे शांती डीपार्टमेंट ऍण्ड जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान आहे. त्यांनी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान सुरू केले होते. त्यांची आई शांताबाई कटारिया या दुकानासमोरील ओटय़ावर खुर्चीवर बसलेल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने शांताबाई यांच्याकडे पाणी बाटली मागितली. त्या पाणी बाटली देण्यासाठी उठताच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरून नेली. या दोन्ही गुह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी सुरू केला आहे.



























































