
तीन टेम्पोंमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या लहान-मोठय़ा 59 म्हशींची शेंडी बायपास चौकात शुक्रवारी सकाळी गोमाता स्वयंसेवकांनी सुटका केली. तिन्ही टेम्पो एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून सहा लाखांचे तीन टेम्पो व तीन लाख 43 हजारांच्या म्हशी असा नऊ लाख 43 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.
हमीद फकीर इनामदार (वय 35, रा. भोईआळी, ता. जुन्नर), जावेद नबाब इनामदार (वय 35, रा. जुन्नर, जि. पुणे) व इरफान रफिक पठाण (वय 24, रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोमाता स्वयंसेवक किरण परसराम गुंड (वय 23, रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
तीन टेम्पोंतून काही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पिंपळगाव माळवी येथील गोमाता स्वयंसेवकांना मिळाली होती. गोमाता स्वयंसेवकांनी शेंडी बायपास चौकात थांबून संशयित तीन टेम्पो पकडले. हे टेम्पो एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. टेम्पोमध्ये चारा-पाण्याची सोय न करता कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले. त्यांतील पाच ते सहा लहान म्हशी जखमी झाल्या आहेत. पोलीस अंमलदार संदीप आव्हाड तपास करीत आहेत.
चांद्यात कत्तलखान्यातून 22 जनावरांची सुटका
नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलखान्यात आणलेल्या 22 जनावरांची सोनई पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाबू दाऊद शेख (वय 35), जावेद इनूस शेख (वय 44), तर शब्बीर पठाण (वय 23, सर्व रा. चांदा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.






























































