
ज्या कुळात आपण जन्मलो त्याचे ओझे न घेता मुळात आपण कोण आहोत याचा शोध घेऊ पाहणाऱया दोन स्त्रियांचा प्रवास चितारणारे ‘जन्मवारी’ हे मराठी नाटक आता रंगभूमीवर दाखल झाले आहे. विशेष म्हणजे ‘जन्मवारी’ या नाटकाद्वारे रंगभूमीवर पंचनायिकांचा आविष्कार अनुभवता येणार आहे. या नाटकातल्या स्त्रियांची स्वत्व शोधण्याची वैचारिक व शारीरिक धडपड आणि त्यातून आयुष्याबाबत त्यांनी घेतलेला निर्णय असा सगळा प्रवास यात मांडण्यात आला आहे. या नाटकाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग 9 फेब्रुवारी रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात उत्साहात सादर करण्यात आला.
हर्षदा संजय बोरकर यांनी ‘जन्मवारी’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांच्या सशक्त व्यक्तिरेखा हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे. या मायलेकींसह शुभांगी भुजबळ, अमृता मोडक व कविता जोशी अशा स्त्री कलाकार मिळून या नाटकात थेट पंचनायिकांचे प्रतिबिंब पडले आहे. मंदार देशपांडे यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. ‘स्वेवन स्टुडिओज’ची निर्माती शांभवी बोरकर आणि सतीश आगाशे यांची निर्मिती आहे.


























































