सिनेमा – सिनेमांचा प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी राहील असा अभिनय करत प्रत्येक भूमिका जगणारा अभिनेता अर्थात व्हिलन ऑफ द मिलेनियम म्हणजे प्राण. आजच्या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे स्मरणरंजन.

प्राण साहेब म्हणजे खलनायकाचं एक आगळं रूप मांडणारा अभिनेता. त्यांनी रंगवलेला खलनायक कधीच कपटी आणि क्रूर नव्हता. नायकामध्ये असणाऱया थोडय़ाफार उणिवांसह आलेला खलनायक आपण आपल्या अवतीभोवती पाहत असतो, पण प्रत्येक वेळी त्या खलनायकाला सापडलेली वेगवेगळी स्टाईल मात्र त्यांनी आपल्या त्या खलनायकी भूमिकेमध्ये आणली होती. त्यांच्या या स्टाईलमुळे आपल्याला एकाच प्राण साहेबांची विविध चित्रपटांतील विविध रूपे आठवतात. उपकार चित्रपटातील लंगडा मलंग चाचा, मजबूर चित्रपटांमधील दोन्ही तळहाताचा गॉगल करून लोकांकडे पाहणारा मायकल, जंजीर चित्रपटामधील तांबडय़ा केसांचा शेरखान, व्हिक्टोरिया नंबर 203 मध्ये रंगवलेला राणा तर कसोटी नावाच्या चित्रपटात त्यांनी साकारलेला नेपाळीदेखील लक्षवेधी होता. प्रत्येक चित्रपटात प्राण आपल्या भूमिकेत खऱया अर्थाने प्राण ओतून ती भूमिका साकारत, तर कधी नायकाच्या भूमिकेपेक्षा काकणभर सरस कशी होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत. अभिनय करताना आपल्या अभिनयाविषयी, भूमिकेविषयी, भूमिकेतील छटांविषयी जाणीव असणे हे अत्यंत संवेदनशील, अभ्यासू आणि सातत्याने भूमिकेचा विचार करणाऱया अभिनेत्याचे लक्षण आहे आणि ते काwशल्य प्राण यांच्यामध्ये होते.

प्राणजींच्या धर्मा या चित्रपटाची आठवण मला येते. धर्मा चित्रपटात ते एक दरोडेखोर आहेत आणि त्याच्याच टोळीमधील भैरव धर्माला पकडून देण्यासाठी पोलिसांना मदत करतो व त्यांच्या साह्याने धर्माला खोटी काडतुसे देतो. रात्रीच्या भयाण अंधारात सावकाराला लुटण्यासाठी जेव्हा धर्मा पोलिसांनी सापळा लावलेल्या त्या गावात पोहोचतो तेव्हा त्याला संशय येतो, ही इतकी भयाण शांतता कशी? तितक्यात पोलीस त्याच्यावर दिव्याचा प्रकाश टाकतात. धर्मा भिंतीच्या आड लपतो आणि प्रकाश येणाऱया त्या दिव्यावर वर गोळी झाडतो. तो विजेचा दिवा फुटत नाही. क्षणार्धात बंदूक बाजूला घेऊन ती आपल्या पायावर ठेवतो आणि गोळी झाडतो आणि धर्माच्या लक्षात येते की, आपण फसवले गेले आहोत. स्वतःच्या पायावर गोळी झाडत असताना तो म्हणतो की, ‘धर्मा का निशाना कभी चूक नही सकता.’ त्या अस्पष्ट अशा उजेडात धर्मा म्हणजे प्राण जेव्हा संवाद म्हणून पायावर गोळी झाडतो तेव्हा प्राणच्या आवाजातून जिवंत झालेला तो संवाद आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा आणल्यावाचून राहत नाही .

सोळा-सतरा वर्षांच्या वयात मी धर्मा चित्रपट पाहिला होता. तेव्हा माझ्यावर चित्रपटातील संस्कार होण्यास नुकताच कुठे प्रारंभ झाला होता. गंमत म्हणजे आज प्राणजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज हा लेख लिहिताना मला त्यांच्या धर्मा या चित्रपटाचा तोच सीन लिहावासा वाटला. इतकी त्या दृश्याची छाप प्राणजींनी आपल्या भूमिकेद्वारे, अभिनयाद्वारे माझ्यासारख्या अनेक चित्रपट रसिकांवर पाडलेली आहे.

प्राणजींच्या उभ्या चेहऱयावर दोन्ही बाजूने येणाऱया कुरळ्या केसांच्या बटा किंवा आकडे आणि त्यांच्या ओठांच्या खाली आलेल्या वक्राकार मिशा म्हणजे दरोडेखोर धर्मा होय. आणि रागात आल्यानंतर ते आकडे जेव्हा त्यांच्या चेहऱयावर येतात आणि त्या आकडय़ातून अत्यंत दाहक नजरेने ते समोरच्याकडे पाहतात तेव्हा तो गर्भगळीत झाल्याशिवाय राहणार नाही इतकी धग त्यांच्या त्या रोखलेल्या डोळ्यांमध्ये असते.

मजबूर हा चित्रपट तसा अमिताभचा आहे, पण या चित्रपटात अगदी शेवटच्या अर्धा पाऊण तासांमध्ये मायकल अर्थात प्राण यांचा प्रवेश होतो; पण त्या अर्धा पाऊण तासात त्यांनी वठवलेला मायकल कायमचा राहिला. खलनायकाच्या भूमिका करत असतानाच प्राणजींनी अनेक चित्रपटांत चरित्र नायकांच्याही भूमिका केल्या. त्या अनेक चरित्र नायकांच्या भूमिकांमध्ये त्यांच्या वाटय़ाला एक गाणे आले. अशा काही मोजक्या अभिनेत्यांपैकी प्राण एक होते.

प्रत्येक चित्रपटात त्यांनी काही लकबी आणल्या होत्या आणि त्यांच्या या लकबी त्यांची ओळख ठरल्या. मजबूर या चित्रपटात हाताची दुर्बीण करून समोरच्या माणसाला निरखण्याची त्यांची लकब त्यांनी आणली होती. या चित्रपटात त्यांनी गाणंही गायलं आणि जयश्री टी बरोबर धमाल नृत्यही केले होते. हे गाणे त्या काळामध्ये खूप पॉप्युलर झाले

हा कोई जो साहेबा ल ल लल ला
दारू की बोटल में साहब पानी भरता है
फिर ना कहना मायकल दारू पिके दंगा करता है

प्रत्येक चित्रपटामध्ये प्राण, प्राण वाटत नाही तर त्या चित्रपटातला तो मायकल असेल तर मायकलच वाटतो. जीव ओतून आपल्या वाटेला आलेली भूमिका करणे आणि तिचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी राहील, असा अभिनय करणे. प्रत्येक भूमिका जगणे आणि म्हणूनच प्रेक्षकांनी प्राणजींना मनापासून स्वीकारले होते.

मला आठवतंय प्राण आणि अमिताभ यांची तीन चित्रपटांत तरी हाणामारीची दृश्ये आहेत एक मजबूर, दुसरा जंजीर आणि तिसरा डॉन. अमिताभ बच्चन यांच्यासमोर त्यांचा अभिनय तितकाच खुलला आहे. या प्रत्येक सीनमधील जुगलबंदी दर्दी रसिकाच्या कायम लक्षात राहण्याजोगी आहे. प्राणजींचे प्रत्येक शब्दावर विशिष्ट पद्धतीने जोर देऊन बोलण्याच्या स्टाईलने तो संवाद अधिक प्रभावी होतो आणि प्राणजी प्रत्येक संवादातून भाव खाऊन जातात.

उपकार चित्रपटात प्राणजींनी मलंग चाचा साकारलेला आहे. त्या काळात प्राणजींची व्रेझ, त्यांचा ऑरा असा होता. चित्रपटातील पहिल्या दृश्यात छोटा मनोज कुमार जो पहिला संवाद बोलतो तो संवाद आहे मलंग चाचा, तो मलंग चाचा म्हणजे प्राण होय . तो मुलगा मलंग चाचाला शोधत निघालेला आहे आणि त्याच्या मागे पॅमेरा मलंग चाचाला शोधत आहे आणि आपल्याला एक पाय तुटलेला मलंग चाचा दिसतो आणि त्याच्या पहिल्या चार संवादामधूनच हे एक अत्यंत वेगळं असे रसायन आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं. आपल्याला कसलेल्या आवाजात तो लहानग्या मनोज कुमारला जीवनाचं सत्य सांगत असतो. ‘चढते सुरज की पूजा सभी करते है जिंदगी में डूबते की परवा कोई नही करता’ त्याचा तो दणकट आवाज शब्दांना कुरवाळून टाकणारा. इतकी सकारात्मक भूमिका साकारणाऱया मलंग चाचांची फिलॉसॉफी त्याच्या गाण्यांतून आपल्यासमोर येते. जीवनात अनेक बऱयावाईट घटना घडतात. एखाद्या घटनेने जेव्हा आपण एकटे पडतो तेव्हा जाणवतं हे गाणं सत्य आहे.

कसमे वादे प्यार वफा सब बाते है बातो का क्या
कोई किसी का नही ये झुटे नाते है नातो का क्या

प्राणजीच्या अनेक भूमिकांचा जर विचार केला तर सातत्याने सकारात्मक भूमिका मांडण्यात त्यांचा हातखंडा होता किंवा तशाच प्रकारच्या भूमिका सातत्याने ते करत आलेले आहेत, असे आपल्याला जाणवते.

जंजीरमधला शेरखान अगदी पठाणी स्टाईलमध्ये बोलणारा. ‘शेर खांन काले का धंदा करता है लेकिन इमानदारी से ‘अमिताभबरोबरच्या त्या पहिल्या दृश्यात प्राण खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अमिताभ त्याला म्हणतो ये पुलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही.’

‘तेव्हा इस इलाके मे नये आये हो वरना शेर खान को काwन नही जानता आज तक शेरखान से किसीने इतनी बडी बात नही कही’ या संवादाच्या वेळी त्यांच्या डोळ्यात उसळणारी क्रोधाची ज्वाला अगदी स्पष्ट दिसते, पण प्राणच्या डोळ्यातून हा संताप, क्रोध व्यक्त होत असताना. अमिताभ मोठय़ाने ओरडला म्हणून तो स्वतः मात्र मोठय़ाने ओरडत नाही. तो तितक्या शांतपणे त्याला उत्तर देतो ‘चिल्लाओ नहीं साहब गला खराब हो जायेगा’ हे प्राणजींचे वैशिष्टय़ होय. पुढे तो अमिताभचा मित्र होतो. आपले सगळे काळे धंदे सोडून देतो . पुन्हा प्राणजींची भूमिका सकारात्मक होते. या चित्रपटातही प्राणजींनी एक कवाली म्हटलेली आहे.

‘यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी’ ही ती कव्वाली सादर करतानाच त्यांचा अभिनय अगदी खास होता. त्यांचा हा दिलदारपणा त्याच्या चालण्यात, दिसण्यात अगदी स्पष्ट दिसतो आणि हा शेर खान आपल्या मनाच्या कप्प्यात आपलं घर करतो.

प्राणजींच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यात एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक खंत व्यक्त केली होती. त्या काळात लोक आपल्या मुलांना आनंद, राजेश, राज ,दिलीप अशी चित्रपटातील कलावंतांची नावं ठेवत होती, पण माझं नाव कोणी ठेवलं नाही. तेव्हा चित्रपटावर लिहिणारे इसाक मुजावर यांनी त्यांना सांगितलं की, चिपळूणमध्ये तुमचे एक फॅन आहेत विश्वनाथ भार्गव जोशी. त्यांनी आपल्या नातवाचे नाव प्राण असे ठेवले आहे आणि आज प्राण जोशी या नावाने तो चिपळूणमध्ये राहत आहे. अनेक जणांनी असे आपल्या मुलांचे नाव प्राण ठेवलेही असेल, पण ती माहिती त्यांच्यापर्यंत आली नाही. तरीही ज्याच्यामुळे चित्रपटात प्राण शिल्लक राहत असे असा अभिनेता काळाच्या ओघात जरी हरवला तरी जोपर्यंत चित्रपटसृष्टी आहे तोपर्यंत एक वेगळा खलनायक, सकारात्मक चरित्र नायक म्हणून त्यांचे नाव चित्रपट रसिकांच्या मनात घर करून राहील हे नक्की.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)