
व्याजाने घेतलेल्या सात लाखांची परतफेड केल्यानंतरही आणखी तेरा लाखांची मागणी करणार्या सावकाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या दोन साथीदारांसह त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र पिरप्पा कांबळे (36, रा. बुधवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकाश कासट, जमीर कदम या त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 28 वर्षांच्या कापड व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. तक्रारदार कापड व्यावसायिक असून त्यांनी या तीन जणांकडून वेळोवेळी सात लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी एकूण 13 लाख 62 हजार रुपये परत केले. यानंतर देखील आरोपींनी तक्रारदारांकडे 13 लाख 50 हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियाला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्याकडे तक्रार अर्ज आला होता. त्यानूसार खंडणी विरोधी पथकाने चौकशी करून कारवाई केली. यातील कांबळे याला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, अंमलदार मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे, रिंवद्र फुलपगारे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
माथाडीच्या नावाखाली खंडणी
वारजेतील काचेच्या व्यापार्याकडे माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्या अविनाश दिलीप अडागळे (32, रा. वारजे) याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. तक्रारदाराकडे आलेला काचेचा टेम्पो रिकामा करण्यासाठी अडागळे याने खंडणीची मागणी केली. याबाबतची माहिती मिळताच अजय वाघमारे यांच्यासह पथकाने कारवाई करीत अडागळे याला ताब्यात घेतले.























































