
खटाव तालुक्यातील तुपेवाडी येथे दोन दुचाकी चोरटय़ांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत खटाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ शिवाजी जाधव (रा. फडतरवाडी, ता. खटाव), सागर संजय शिंदे (वय 27, रा. कापील, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीचा तपास करत असताना दुचाकी चोरीतील एक व्यक्ती तुपेवाडी येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुपेवाडी येथे सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. तर, दुसरा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस हवालदार अमोल माने यांनी पाठलाग करून त्याला पकडले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीची चौकशी केली असता, त्यांनी ती दुचाकी कराडमधील यशवंतराव चव्हाण ब्लड बँक सुपर मार्केट येथून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी अजून तीन दुचाकी चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्या दुचाकीही हस्तगत केल्या असून, दोन्ही दुचाकीचोरांना कराडमधील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, सहायक फौजदार तानाजी माने, सुधीर बनकर, मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, राजकुमार ननावरे, अमोल माने आदींनी या कारवाईत भाग घेतला होता.

































































