मिंधे सरकारच्या अनास्थेचा बळी, पगार न झाल्याने कवठेमहांकाळ येथे एसटी चालकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयाने आदेश देऊनही वेळेवर पगार होत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या कवठेमहांकाळ एसटी डेपोतील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्य सरकारच्या अनास्थेच्या कारभारामुळे चालकाचा बळी गेला. यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले आहेत.

भीमराव सूर्यवंशी हे सांगली जिह्यातील कवठेमहांकाळ एसटी डेपोमध्ये चालक म्हणून काम करत होते. वेळेवर पगार होत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक ओढाताण होत होती. सूर्यवंशी प्रचंड तणावाखाली होते. त्यातून सूर्यवंशी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जिह्यात खळबळ उडाली. कवठेमहांकाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अनेक कर्मचारी तणावाखाली

दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे नियमित पगार करावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु शिंदे-फडणवीस सरकारकडून या आदेशाचे पालन केले जात नाही.

फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा झाला तरी अद्याप जानेवारीचा पगार झालेला नाही. एसटीचे सुमार 90 हजार कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

अनेक कर्मचारी तणावाखाली असून, राज्य सरकारविरुद्ध संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.