
हिंडनबर्ग रिपोर्टनुसार अदानी समूहाचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतरसुद्धा मोदी सरकार या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) नेमायला का घाबरत आहे, असा सवाल करतानाच, या प्रकरणाची जेपीसी चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया काँग्रेस समिती (AICC) चे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.
अदानी घोटाळ्याबाबत कॉंग्रेसने विचारलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान उत्तर देत नाहीत. गौतम अदानींचे ते नावदेखील घेत नाहीत. संसदेमध्ये गौतम अदानींचे नाव उच्चारण्याससुद्धा परवानगी नाही का, असा सवाल त्यांनी केला. पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंह हे पंतप्रधान असताना विरोधकांनी जेव्हा जेव्हा जेपीसीची मागणी केली होती तेव्हा तेव्हा जेपीसीला परवानगी देण्यात आली होती, याचा दाखला त्यांनी दिला. मोदी हे आपल्या मित्राला म्हणजेच अदानींना वाचविण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा पैसा बुडवत आहेत आणि येणाऱ्या पिढीला धोक्यात घालत आहेत. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
केतन पारेख व हर्षद मेहता प्रकरणाच्या वेळेस त्यावेळच्या काँग्रेस सरकारने सर्वप्रथम त्यांचा पासपोर्ट जप्त केला होता. त्याचप्रमाणे गौतम अदानींचा पासपोर्ट त्वरित जप्त करावा, असे यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले. यावेळी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, प्रवक्ते युवराज मोहिते उपस्थित होते.




























































