नगर नामांतर; धनगर समाजाच्या रेट्यामुळे खासदार सुजय विखें यांनी घेतली माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या भाजपचे खासदार सुजय विखे यांना धनगर समाजाच्या रेट्यामुळे अखेरीस माघार घ्यावी लागली आहे. विशेष म्हणजे आज नगर येथे झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी ‘नामांतराला माझा विरोध नाही’ असे म्हणत ‘उलट मीच शहराचे नामांतर अहिल्यादेवी करून आणणार असा निर्धार जाहीरपणे व्यक्त केला.

धनगर समाजाचा वधू वर सूचक मेळावा आज नगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार अ‍ॅडव्होकेट रामहरी रुपनर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक निखिल वारे, वधू वर सूचक मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वावळ, इंजिनिअर रंगनाथ भोंडवे, अध्यक्ष दत्तात्रय गावडे, निशांत दातीर, सचिन डफळ, काका शेळके, शरद धनपे, सूर्यकांत तागड, ज्ञानेश्वर घोडके, विजय शीपणकर, डॉ नामदेव पंडित, दशरथ लांडगे, राजेंद्र पाचे, पी आर शिंदे, वसंतराव दातीर, सोपान राहीज आदी मान्यवर उपस्थित होते.

नगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला पण त्याला खासदार सुजय विखे यांनी त्यावेळी विरोध केला होता. विरोध केल्यानंतर धनगर समाज हा जिल्ह्यामध्ये आक्रमक झाला, या समाजाने थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर समाजाची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये जो या नामांतराला विरोध करेल त्याला त्याची जागा दाखवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे याच नामांतरासाठी धनगर समाजाने दिनांक 9 फेब्रुवारी पासून चौंडी येथून यात्रा सुरू केली आहे त्याचा समारोप उद्या नगर येथे होणार आहे.

अहिल्याबाई होळकर यांच्या नावाला खासदार सुजय विखे यांनी विरोध केल्यानंतर कोल्हापूर येथील विठ्ठल मंदिराचे नारायण मोठे देसाई यांनी आम्ही विखेंना जुमानत नाही आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा गर्भित इशारा नगर येथे येऊन दिला होता ,त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये विखेंच्या विरोधामध्ये चांगलेच वातावरण तापले होते.

आज धनगर समाजाने वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला त्यांनी अनेक जणांना निमंत्रण दिले होते त्यामध्ये भाजपाचे खासदार सुजय विखे यांचा समावेश होता. त्यांचे भाषण सुरू असतानाच नागरिकांनी अगोदर तुम्ही नामांतरावर बोला आपली भूमिका मांडा अशी आग्रहाची मागणी केली विशेष म्हणजे खासदार सुजय विखे हे वधू वर मेळाव्यामध्ये नेमकी भूमिका काय असं सांगत असतानाच हा विषय सुरू झाल्यामुळे अखेरीस खासदार सुजय विखे यांना नामांतरावर बोलण्याशिवाय पर्याय उरला नाही.

अहिल्याबाई होळकर यांचे कार्य हे देशाला माहीत आहे. त्यांचा जन्म नगर जिल्ह्यामध्ये झाला आहे. जर त्यांचे या नगर जिल्ह्याला नाव देणार असेल तर अगोदर मी जाऊन तेथे सत्कार करेल. नामांतर घडवून आणण्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करेल असे सांगून त्यांनी पुढच्या वधू वर मेळाव्याला अहिल्यानगर नाव झालेले असेल अशी ग्वाही सुद्धा दिली.

त्यामुळेच विखे यांनी ऐनवेळेला बदललेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू होती. एकंदरीतच सुरुवातीला विखे यांनी नामांतराला विरोध केला पण आता धनगर मेळाव्याला हजेर राहून एक प्रकारे धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जाण्यापेक्षा आपण आता आपली भूमिका बदलू असाच विखे यांचा मानस असावा असे बोलले जात आहे.