
बिहारची राजधानी पाटणा येथे पार्किंगच्या वादाला हिंसक वळण लागल्याने पाच जणांवर गोळीबार झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पाटणा शहरातील जेठुली परिसरात घडली आहे. त्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला आहे.
पाटणा येथील जेठुली परिसरात पार्किंगवरून हा वाद झाला होता. येथील परिसरात उमेश राय नावाचा एक माणूस राहतो. तो तिथला गुंड म्हणून कुप्रसिद्ध आहे. सामान्यांच्या जमिनी हडपून त्यांच्यामार्फत पैसे कमावणं हा त्याचा व्यवसाय आहे. त्याचे राजकीय पक्षांशीही चांगले संबंध आहेत. त्याच्यासोबत पार्किंग लॉटमधून गाड्या बाहेर काढण्यावरून वाद झाला होता. पार्किंग लॉटच्या रस्त्यावर एका ठिकाणी बांधकाम पाडण्याचं कार्य रायकडून सुरू होतं. त्याचा ढिगारा रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला आणि गाड्यांना अडथळे होऊ लागले.
त्यावरून वाद झाला आणि त्याची परिणती भांडणात झाली. उमेश रायच्या गुंडांनी वाद घालणाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. यात पाच जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोन जण जागीच मरण पावले तर तीन जण अद्याप गंभीर आहेत. या प्रकारानंतर पूर्ण गावातील लोक तिथे जमा झाले आणि त्यांनी उमेश राय तसंच त्याच्या गुंडांवर हल्लाबोल केला.
संतापलेल्या जमावाने त्याचं घर, कम्युनिटी हॉल, घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या यांना आग लावली. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पण, जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. जमावाने तेथील एक बायपास रस्त्यावर उतरून वाहतूक थांबवली. ते आरोपींना जिवंत जाळण्याची मागणी करत राहिले. सुदैवाने पोलिसांनी राय आणि त्याच्या कुटुंबाला तिथून बाहेर काढलं. सध्या परिसरात तणावपू्र्ण शांतता असून तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




























































