
चुलत भावाच्या घरात चोरी करणार्या भावडांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 10 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. करण उर्फ विकी अजित रणसिंग (वय 28 ) आणि सुशिल अजित रणसिंग (वय 32 रा. इरिगेशन कॉलनी, दौड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रिया महेश रणसिंग यांनी 16 ऑक्टोबरला दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .
फिर्यादी प्रिया दौंडमधील इरिगेशन कॉलनीत राहायला असून कार्यक्रमानिमित्त कुटूंबियासह बाहेरगावी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बाथरूम खिडकीवाटे जाळी उचकटून प्रवेश करीत 10 लाखांचे दागिने चोरुन नेले. दरम्यान, कार्यक्रमानंतर प्रिया घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, दागिन्यांची चोरी चुलत दीर करणने केली असल्याचा संशय प्रियाने व्यक्त केला. दौंड पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावून तपास केला. मात्र, त्याने खोटी उत्तरे देउन पोलिसांची दिशाभूल केली.
संबंधित घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेकडूनही तपास करण्यात येत होता. याप्रकरणी पथकाने माहिती काढून करणला बोलावून घेत विचारपूस केली. त्याला वेगवेगळया प्रकारे प्रश्न विचारून कौशल्यपुर्ण तपास केला. त्यावेळी करण उर्फ विक्रीने गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिन्यांसाठी त्याने भाउ सुशीलच्या मदत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेउन १० लाखांचे दागिने जप्त केले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक राहूल गावडे, हवालदार सचिन घाडगे, हवालदार आसिफ शेख, विजय कांचन, मुकुंद कदम यांनी केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता चवरे करीत आहेत.
























































