गोव्यातील ट्रेकचा भन्नाट अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा म्हणजे पर्यटकांच्या नकाशावर अव्वल स्थानी असलेले राज्य. उंच डोंगर, लाल माती, निळाशार समुद्र आणि दुधापेक्षाही सफेद धबधबे अशा सुंदर ठिकाणांमुळे गोवा पर्यटकांना खुणावते. ट्रेकर्ससुद्धा गोव्यात आवर्जून भेट देतात.

दूधसागर धबधबा

मांडोवी नदीवर स्थित, दूधसागर धबधबा 240 चौरस किमी संरक्षित क्षेत्रात, भगवान महावीर अभयारण्य आणि मोलेम राष्ट्रीय उद्यानात वसलेला आहे. हा जवळजवळ कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवर असलेला चारस्तरीय धबधबा आहे. देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी हा एक असून त्याची उंची जमिनीपासून सुमारे 1 हजार फूट आहे. दूधसागर म्हणजे ‘दुधाचा समुद्र’जणू.  बारमाही असला तरी पावसाळय़ात धबधब्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते. त्यामुळे लाखो पर्यटक व ट्रेकर्स मोठय़ा संख्येने या ठिकाणाला भेट देतात.

उडान डोंगर ट्रेक

हा गोव्यातील नैसर्गिक सुंदरतेचे प्रतीक असलेला ट्रेक आहे. सुमारे 16 किमी लांब, उडान डोंगर ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. ट्रेक पणजीपासून सुरू होतो. वाल्पोई, गोवा येथे असलेल्या ट्रेकवर जाण्यासाठी सर्व बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत. हा भाग वन्यजीवांसाठी संरक्षित म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. वन्यजीव पाहण्याचा आयुष्यभराचा अनुभव मिळतो. कोणत्याही महिन्यात जा आणि गोव्यातील हे ट्रेक पूर्ण करा. एक रोमांचक अविस्मरणीय अनुभव घ्या.

वाघेरी माऊंटेन ट्रेक

वाघेरी माऊंटेन ट्रेक हा गोव्यातील सर्वात सुंदर ट्रेक आहे, असे म्हटले जाते. वाघेरी म्हणजेच वाघांचे निवासस्थान, असे तेथील रहिवासी म्हणतात. हे गोव्यातील तिसरे सर्वोच्च शिखर आहे, जे 726 मीटर उंचीवर वसलेले आहे. जैवविविधतेने संपन्न, विविध वनांच्या आच्छादनाने व्यापलेले आहे. फोटोग्राफरसाठी तर ही पर्वणी. तिथले निसर्ग कॅमेऱयात टिपण्याचा मोह कुणाला होणार नाही.  ट्रेक पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन तास पुरेसे आहेत.

  • मानसी पिंगळे,  म. ल. डहाणूकर