धारावीतील आगीत 80 झोपड्या खाक, सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावीमध्ये आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत 80 हून अधिक झोपडय़ा जळून खाक झाल्या. आग लागताच रहिवाशांनी मिळेल त्या मार्गाने घराबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. तब्बल आठ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

धारावीतील कमला नगर येथील झोपडपट्टीला पहाटे 4.20 च्या दरम्यान आग लागली. या ठिकाणी इलेक्ट्रिक  वायरिंग, कपडे, कागद,  शिलाई मशीन, गारमेंट, बेकरी आदी साहित्य मोठय़ा प्रमाणात असल्याने काही क्षणांतच आगीचा भडका उडला. आगीचा भडका जास्त असल्याने अग्निशमन दलाने आगीची लेव्हल-3 ची घोषणा केली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 फायर इंजिन, 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. सुमारे आठ तासांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आगीच्या नेमक्या कारणाची चौकशी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.