काँग्रेस कार्यकारिणीची निवड होणार नाही, सदस्य नामनिर्देशित करण्याचे खरगे यांना अधिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य नामनिर्देशित करण्याचे अधिकार दिले जातील. असा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीने शुक्रवारी एकमताने घेतला. याबाबत माहिती देताना पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सुकाणू समितीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षांना कार्यकारिणीच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी जयराम रमेश यांनी सांगितले की, आम्ही काँग्रेसच्या घटनेत एक दुरुस्ती आणत आहोत, ज्या अंतर्गत दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला, तरुण आणि अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधित्व सुरक्षित आणि सुनिश्चित करण्यासाठी तरतूद केली जाईल. कार्यकारिणीची निवडणूक घेण्यासाठी किंवा सदस्यांना नामनिर्देशित करण्यासाठी अध्यक्षांना अधिकार देण्याचीही काँग्रेसच्या घटनेत तरतूद आहे.

निवडणुकीच्या बाबतीत, काँग्रेस कार्यकारिणीच्या एकूण 25 सदस्यांपैकी 12 सदस्य निवडले जातात आणि 11 सदस्यांना पक्षाध्यक्ष नामनिर्देशित करतात. काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस संसदीय पक्षाचा नेता आपोआप कार्यकारिणीचा सदस्य असतो. याआधी काँग्रेस सुकाणू समितीच्या बैठकीला गांधी कुटुंबीय उपस्थित राहणार नसल्याची बातमी आली होती. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी छत्तीसगडच्या रायपूरमधील महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी कुटुंबाला काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निर्णय घेण्यास सूट द्यायची आहे. 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकांसाठी पक्षात विचारमंथन अपेक्षित आहे. निवडणुकीतील सलग पराभव आणि अनेक वर्षांच्या अंतर्गत भांडणानंतर आणि नेत्यांच्या पलायनानंतर, सोनिया गांधींनी ऑक्टोबरमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे 137 वर्षे जुन्या संघटनेची सूत्रे सोपवली.

यंदा रायपूरमध्ये काँग्रेसचे 85 वे अधिवेशन होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक रोडमॅप आणि समविचारी पक्षांसोबत निवडणूक युती करण्यासाठीची रणनीती निश्चित करणे अपेक्षित आहे. यामध्ये काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीचा मार्ग मोकळा करणे अपेक्षित आहे. काँग्रेसच्या अधिवेशनात सुमारे 15 हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.