भांडणात मध्यस्थी केल्यामुळे भावडांवर खुनी हल्ला; पुण्यातील साखर संकुल येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने दोघा भावडांवर वार करुन खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 25 फेब्रुवारीला पावणेदोन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील साखर संकुलनजीक घडली. विनोद शांताप्पा रुपनुर (वय 27) आणि विशाल रुपनुर (दोघेही रा. म्हाळुंगे) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रसाद गावडे, ऋषीकेश राठाडे यांच्यासह इतरांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीतील आहेत. 24 फेब्रुवारीला आरोपी प्रसाद आणि इतरांची भांडण सुरू असताना विनोदने मध्यस्थी केली होती. त्याच राग आल्यामुळे आरोपींनी विनोद आणि त्याचा भाउ विशालला साखर संकुल परिसरात बोलावले. त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी विशालच्या पोटात वार केला. तर विनोदच्या डोक्यात वार करुन दोघांना गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.